शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीतील पहिलीत जाणाऱ्या शिशुंचा निरोप समारंभ संपन्न

मालवण ता.०३-:* मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये चालणाऱ्या शिशुविहार- काळे आजींच्या बालवाडीतील पहिलीत जाणाऱ्या शिशुंचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.

यानिमित्त मुलांनी सहल व वनभोजन, वेशभूषा व नृत्य करत धमाल मजामस्ती केली. तर मुख्य निरोप समारंभात मुलांना खाऊ वाटप करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीत शैक्षणिक वर्ष अखेर निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात मोठ्या गटाची रॉक गार्डन येथे सहल व वनभोजन संपन्न झाले. तसेच लहान गटाची माघी गणेश सिद्धिविनायक मंदिरात सहल व शाळेच्या आवारात वनभोजन संपन्न झाले. तर छोटेखानी स्नेहसंमेलनात चिमुकल्या मुला- मुलींनी विविध वेशभूषा परिधान करत मराठी- हिंदी गाण्यांच्या तालावर धमाल नृत्य करत मजामस्ती केली. या दरम्यान मोठ्या गटातील मुलांची आकलन चाचणी (परीक्षा) देखील पार पडली. पहिलीत जाणाऱ्या मोठ्या गटाच्या मुलांचा निरोप समारंभ पालकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुलांना बालवाडीतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी बालवाडीचे श्रीधर काळे (काळे आजोबा) यांनी सर्वांचे स्वागत केले. जबाबदार पालकाची भूमिका पार पाडण्यासाठी पालकांनी संपर्कात राहून माहितीची देवाणघेवाण करावी, देशाच्या भावी पिढीचे पालक या नात्याने आपण देशाच्या भवितव्याचे विश्वस्त आहोत, यासाठी बालवाडी एक संपर्क केंद्र म्हणून सहाय्य करेल, असे यावेळी श्री. काळे यांनी सांगितले. तर बालवाडीच्या मुख्यशिक्षिका सौ. संस्कृती बांदकर ऊर्फ कमल बाई यांनी कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्षे बालवाडी चालविणे अत्यंत कठीण बनले असताना महामारी ओसरल्यावर सर्व पालकांनी सातत्याने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळेच आम्ही मुलांना शिकवू शकलो, असे सांगत पालकांचे आभार मानले. तसेच मराठी माध्यमात मुलांना शिक्षण देण्याच्या पालकांच्या निर्णयामुळे मुलांना खूपच फायदा होणार आहे, असेही सौ. बांदकर यांनी सांगितले.

यावेळी सौ. संस्कृती बांदकर व त्यांच्या सहकारी शिक्षिका यांनी कोरोना काळातही मुलांसाठी दाखविलेल्या अभ्यासपूर्ण उपक्रमशीलतेचे श्री. काळे यांच्यासह पालकांनी कौतुक केले. यावेळी छोट्या मुलांनी देखील पुढे येऊन आपल्या निरागस बोलण्यातून बालवाडी व बाई यांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. तर पालकांच्या वतीने सौ. प्राची तारी आणि सौ. संजना मांजरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. बालवाडी संचालिका सौ. मालती काळे यांनी मुलांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत आम्ही केव्हाही सहकार्याला उत्सूक आहोत, असे सांगत सर्व मुलांना शुभेच्छा देत आभार मानले. यावेळी सहाय्यक शिक्षिका निशा बिडये, सौ. शालन सावंत, सौ. प्रज्ञा राणे, सौ. शर्वरी घाडी यांसह पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page