मालवण ता.०३-:* जात पडताळणी आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी गाबित समाज बांधवांना येत असलेल्या अडचणींबाबत तांत्रिक मार्गदर्शनासाठी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांसमवेत देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे बैठक आयोजित करण्यात यावी.
यासंदर्भात महसूल आणि जात पडताळणी विभागाने संयुक्तपणे लवकरात लवकर कार्यवाही करून गाबित समाजातील लोकांवर होत आसलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तत्पूर्वी कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची कुडाळला भेट घेऊन गाबित समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, राष्ट्रीय संघटक चंद्रशेखर उपरकर, मालवण शाखा अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, सदस्य नरेश हुले, भाऊ मोरजे, सल्लागार महेश जुवाटकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी व उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविताना गाबीत जात म्हणून विशेष मागास प्रवर्गाचे दाखल मिळविण्यासाठी आणि जात पडताळणीसाठी प्रशासकीय स्तरावर तसेच जात पडताळणी विभागाकडून अनेक हरकती घेतल्या जात असल्यामुळे किंबहुना जातीच्या दाखल्याची प्रकरणेंच सादर करुन घेतली जात नसल्याने जातीचे दाखले प्राप्त करण्यास आणि शासनाच्या शैक्षणिक सवलतींपासून वंचित व्हावे लागत आहे. यासंबंधीच्या काही तक्रारी विद्यार्थी व नागरिकांनी गाबीत समाजशाखा मालवण येथील बैठकीत प्रत्यक्ष केल्या आहेत. त्यावर योग्यते निर्देश शासन स्तरावरून देण्यात यावेत व गाबीत समाज बांधवांना योग्य तो न्याय देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
