मालवणात वारकरी कीर्तन महोत्सवाचा वारकरी दिंडीने शुभारंभ

*⚡मालवण ता.३०-:* बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि वार्षिक रिंगण यांच्यावतीने वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज मालवण शहरातून वारकरी दिंडी काढून करण्यात आला. पारंपारिक वेश परिधान करत , टाळ मृदुन्ग आणि चिपळ्यांचा गजर करत, अभंगांचे गायन करीत काढलेली ही वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली.

बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि वार्षिक रिंगण यांच्यावतीने दि. ३० एप्रिल ते ३ मे या कालावधीत वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ही कीर्तने रात्री ९.३० वा भरड, मालवण येथील दत्त मंदीरात होणार आहेत. शनिवार दि. ३० एप्रिल रोजी ह.भ.प. देवदत्त महाराज परुळेकर यांचे ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या विषयावर कीर्तन होईल. रविवार दि.१ मे रोजी ह.भ.प. अभय महाराज जगताप, सासवड पुणे यांचे ‘नामा तयाचा किंकर तेणे केला हा विस्तार’ या विषयावर कीर्तन होईल. सोमवार दि. २ मे रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर घेरडीकर पंढरपूर यांचे ‘जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत’ या विषयावर कीर्तन होईल. मंगळवार दि. ३ मे रोजी ह.भ.प. स्वामिराज महाराज भिसे, आळंदी यांचे ‘तुका झालासे कळस॥’ या विषयावर कीर्तन होईल.

कीर्तनाला आळंदी व पंढरपूर येथील पखवाजी व टाळकरी वारकरी साथ करणार आहेत. वारकरी सांप्रदायाचे कार्य तत्वज्ञान व इतिहास यांचा परिचय या कीर्तनांतून होणार आहे. या कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ वारकरी दिंडी काढून करण्यात आला. भरड दत्त मंदिर येथून मालवण बाजारपेठेतून ही दिंडी काढण्यात आली. यावेळी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून मुली व महिला तसेच पारंपारिक वेश परिधान करून पुरुष सहभागी झाले होते. तसेच वारकरी वेशात टाळ मृदुन्गाच्या साथीने अभंग व भजन गात ही दिंडी काढण्यात आली.

You cannot copy content of this page