अत्यावश्यक ठिकाणच्या बंधाऱ्यांच्या कामासाठी खासदार निधीतून १ कोटी निधी देणार…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे देवबाग वासियांना आश्वासन…

मालवण (प्रतिनिधी) आपण आमदार झाल्यावर जिल्ह्यात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सेवा देतानाच हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केल्यामुळे आज पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे. आपण आणलेल्या विमानतळ, सिवर्ल्ड यासारख्या प्रकल्पांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला. आज देवबाग पर्यटन दृष्ट्या नावारूपास आले असले तरी याठिकाणी मी बंधारा बांधल्यानंतर आजपर्यंत बंधारा झालेला नाही. इथल्या आमदारात बंधारा बांधण्याची धमक नाही. देवबाग बंधाऱ्यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या पावसाळ्यात गावात ज्या ठिकाणी समुद्राचे पाणी भरते अशा अत्यावश्यक ठिकाणच्या बंधाऱ्याच्या कामासाठी आपल्या खासदार निधीतून १ कोटीचा निधी देणार असल्याचे केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी देवबाग येथे बोलताना केले. केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज देवबाग गावाला भेट देऊन मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहराध्यक्ष दीपक पाटकर, अशोक तोडणकर, बाबा मोंडकर, सौ. नमिता गावकर, विजय केनवडेकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी रापणकर मच्छीमार आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने नारायण राणे यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी राजन तेली म्हणाले, नारायण राणे आमदार झाले नसते तर देवबाग बंधारा झाला नसता, ज्यांनी बंधारा बांधला त्यांचा लोकांनी विसर पडू देऊ नये, असेही ते म्हणाले. यावेळी बाबा मोंडकर यांनी मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न मांडताना किनारपट्टीवरील मच्छीमार व्यवसायाची माहिती देणारे केंद्र निर्माण करावे, तसेच मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळी देखील माहिती दर्शक केंद्र उभारावे अशी मागणी केली. यावेळी इतर मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांनीही मनोगत व्यक्त करत देवबाग गावात बंधारा व्हावा, वादळात तुटलेल्या वीज वाहिन्या पूर्णपणे नवीन कराव्यात किंवा भूमिगत वीज वाहिन्या टाकाव्यात, गावासाठी नळपाणी योजना राबवावी, अशा विविध मागण्या केल्या.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, मालवण मतदार संघासाठी तसेच जिल्ह्यासाठी अनेक कामे करूनही आपला झालेला पराभव आपल्या जिव्हारी लागला होता. आपल्या पराभवानंतर जिल्ह्यात विकासकामे झालेली नाही. आपण पर्यटन जिल्हा घोषित केला नसता तसेच निवास न्याहारी योजना केली नसती तर आज जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय झाला नसता. आज सिवर्ल्ड झाला असता तर जिल्ह्याचे चित्र बदलले असते. सागरी अतिक्रमण देवबाग गावात आपण प्रथम बंधारा बांधल्यानंतर आजपर्यंत याठिकाणी बंधारा झाला नाही. बंधारा का झालं नाही यास लोक जबाबदार असून आताच्या आमदारांमध्ये बंधारा बांधण्याची धमक नाही. पावसाळ्यापूरते बंधाऱ्याच्या अत्यावश्यक ठिकाणच्या कामासाठी आपण खासदार फंडातून १ कोटी निधी देऊ, देवबाग वासीयांनी घाबरून जाऊ नये, असेही राणे म्हणाले. मालवण शहरासाठी आपण स्पेशल केस म्हणून नळपाणी योजना करून घेतली. शंभर नाईक आले तरी त्यांच्यात असे काम करण्याची धमक नाही. आपल्या पराभवानंतर इथला आमदार वीज, पाणी अशा सुविधा देऊ शकला नाही.आमदारांनी अगरबत्ती, खडीसाखर वाटून दोन तीन रुपयात लोकांची मते विकत घेतली. त्यामुळे यापुढे लोकांनी उमेदवार पारखून मते द्यावीत.

इथल्या मच्छीमारांनी आधुनिक मच्छीमारीने पैसे मिळवावेत. परिश्रम आणि प्रामाणिकपणाची जोड देऊन काम करावे. मच्छीमारी व्यवसायातून पर्यटन दृष्ट्या विकास साधण्यासाठी मच्छीमारीचा इतिहास व विविध प्रकारची मच्छीमारी कशी केली जाते याची माहिती देणारे केंद्र उभारून पर्यटकांना नवे आकर्षण निर्माण केले जाईल. हे केंद्र मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळी देखील माहिती दर्शक व पर्यटन दृष्ट्या आवश्यक केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करू, आपण देऊ तो शब्द पूर्ण करणार आहोत, असे यावेळी राणे यांनी सांगितले. यावेळी अवि सामंत, गणेश कुशे, महेश मांजरेकर, दादा नाईक, राजू परुळेकर, मंदार लुडबे, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, सहदेव साळगावकर, नादार तुळसकर यांसह मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page