सध्याचे राज्यसरकार म्हणजे लुटारू सरकार – आम. सदाभाऊ खोत

*⚡मालवण ता.२९-:* सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या घरावर दिवसाढवळ्या दरोडा घालण्यासाठी जन्माला आलेले सरकार आहे. लुटारू सरकार कडून जनतेने अपेक्षा तरी कोणत्या कराव्यात. आज शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या प्रश्नावर बोलायला कोण तयार नाही. आगीत तेल ओतून प्रश्न पेटविण्याचे काम सरकार करत असून त्यापेक्षा सरकार म्हणून काम करावे. भोंग्यांच्या विषयात आम्हाला अजिबात रस नाही. शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देण्यात आम्हाला जास्त रस असल्याची भुमिका भाजपप्रणित विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे स्पष्ट केली. ‘जागर शेतकऱ्यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यातून शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आम. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

त्यानंतर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाई मांजरेकर, संतोष लुडबे आदी उपस्थित होते. यावेळी आम. सदाभाऊ खोत म्हणाले, आज कोकणातील मच्छीमार व शेतकरी यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायला कोण तयार नाही.

तौक्ते वादळात मच्छीमार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना पुरेशी मदत मिळालेली नाही. कोकणातील मच्छीमाराना कर्जमुक्ती योजना लागू केली पाहिजे. ज्या कोकणच्या पाठिंब्यावर शिवसेना मोठी झाली त्या कोकणातील प्रश्न सोडविण्यासाठी ठाकरे सरकारला वेळ नाही. निवडणुकी पूर्वी मोठ्या घोषणा करणाऱ्या शिवसेनेने जाहीरनामे चुलीत घालावेत. एखादी गोष्ट केंद्र सरकारमुळे झाली नाही असे सांगण्याची सवय राज्य सरकारला लागली आहे. जी गोष्ट राज्य सरकारला करायची नाही त्यासाठी केंद्र सरकार कडे बोट दाखविले जाते. जीएसटी परतावा मिळाला नाही असा खोटा आरोप राज्य सरकार करत आहे, असेही आम. सदाभाऊ खोत म्हणाले. आजचे राज्यसरकार हे मातोश्रीवरून नाही तर सिल्व्हर ओक वरून चालत आहे. जातीय मुद्द्यांना खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे. जातीची उतरण करण्याचे महापाप पवार करत आहेत. भोंग्याच्या प्रश्नांत मला रस नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात रस आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

You cannot copy content of this page