कणकवली ता.२८-:* मालवणी बोलीत नाटक आणि कवितांबरोबरच सशक्त कथा , कादंबऱ्या लिहिणारी नवी पिढी आता पुढे येत असल्याने या बोलीला उज्ज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ .महेश केळुसकर यांनी करतानाच मालवणी भाषा स्वाभिमानाने बोलली पाहिजे तर खऱ्या अर्थाने मालवणी भाषा टिकेल व आणखीन समृद्ध होईल ,असे ते म्हणाले. स्वामीराज प्रकाशनच्या मासिक उपक्रमांतर्गत मराठी आठव दिवसानिमित्त वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांची अभिनेते निलेश पवार यांनी मुलाखत घेतली .
स्वामीराज प्रकाशनच्या मासिक उपक्रमांतर्गत मराठी आठव दिवस साजरा
मराठीच्या सर्व ५३ बोलीभाषांचे शब्दकोश प्रकल्प शासनाच्या मराठी भाषा विभागाने तज्ज्ञांकडून तयार करून घेतले तर मराठी भाषा संवर्धनाचे एक मोठे काम होईल , असेही ते म्हणाले . निलेश पवार यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीत डॉ.महेश केळुसकर यांनी आपल्या लेखनाची मूळे मालवणी मुलूखबोली आणि लोकजीवनात असल्याचे स्पष्ट केले . मालवणी भाषेला फार मोठा इतिहास आहे . या भाषेला असलेला इतिहास आजच्या पिढीला समजून सांगितला पाहिजे , भाषा अशुद्ध नसते. प्रमाणभाषा व बोलीभाषा हे भाषेचे प्रकार आहेत. मालवणी भाषा स्वाभिमानाने बोलली पाहिजे तर खऱ्या अर्थाने मालवणी भाषा टिकेल व आणखीन समृद्ध होईल , असे डॉ केळुसकर यांनी सांगितले. मराठी व बोलीभाषांचे अस्तित्व टिकून रहायचे असेल तर लोककला व लोकसंस्कृतीचा प्रचार व प्रसार केला पाहिजे , असे श्री. केळुसकर यांनी सांगितले .
मालवणी भाषेचा प्रचार व प्रसार प्रामुख्याने मच्छींद्र कांबळी यांनी संगीत वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात व सातासमुद्रापार केला त्यामुळे मालवणी भाषेची गोडी सर्वांना लागली आहे त्यामुळे कोकणी माणूस मालवणी भाषा बोलताना कचरत नाही , असे त्यांनी आवर्जून सांगितले . मराठीचे अस्तित्व अबाधित ठेवायाचे असेल तर मराठी माणसाने दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा , असे आवाहन त्यांनी करताना स्वामीराज प्रकाशन या संस्थेने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जे कार्य काही घेतले आहे त्या कार्याला कणकवलीकरांनी सहकार्य करावे . स्वामीराज प्रकाशन या संस्थेचे ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे , असे आवाहन त्यांनी केले
यावेळी डॉ . भाऊ कोरगावकर , निवृत्त अधिकारी सतीश लळीत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे , वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष एन. आर. देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामीराज प्रकाशन या संस्थेतर्फे ‘ बोलीभाषेच मराठीवर अतिक्रमण होते आहे का ? या विषयावरील निबंध स्पर्धा घेतली होती या स्पर्धेत प्रथम सुरभी ओगले ( देवगड , द्वितीय विपुल शेट्ये ( करूळ ) तृतीय – सिद्धी मोरे ( कणकवली ) यांनी व मांक पटकाविला होता . या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . यावेळी विलास खानोलकर , डॉ . सई लळीत , कमलेश गोसावी , श्रेयस शिंदे यांचे कवी संमेलन संमेलन पार पडले . या संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रसिकांच्या आग्रहास्तव झिणझिणाट ‘ ही कविता डॉ . महेश केळुसकर यांनी सादर केली . या कार्यक्रमादरम्यान , निकेत पावसकर यांच्या संग्रहातील खास मराठी पत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते .
