सिंधुदुर्गनगरी ता २५ वराड ग्रामस्थ संघ मुंबई संचालित सौ हिराबाई भास्कर वरसकर विद्या मंदिर , कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुक्यातील वराड येथील सौ हिराबाई भास्कर वरसकर विद्या मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते तर पेट्रोलियम अँड गॅस वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रफुल्ल कालेलकर ,प्रणव कालेलकर, संतोष साटविलकर, वराड सरपंच सीताराम मिठबावकर, वराड ग्रामसंघ मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सौ हिराबाई भास्कर वरसकर विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त २९ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवाय हॉलीबॉल, रांगोळी, पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता “स्वयंरोजगारापासून ग्रामसमृद्धी” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१ मे रोजी सकाळच्या सत्रात १० ते १ या वेळेत “स्पर्धा परीक्षेची तयारी” या विषयावर परिसंवाद असणार आहे. दुपारी ३ वाजता सुवर्णमहोत्सव स्मरणिका प्रकाशन होणार असून या दिवशी विद्यार्थ्यांचे मनोरंजन कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी पाटील यांनी केले आहे.
