संध्या नरे-पवार:मुंबईत जनवादी साहित्य संमेलनाध्यक्षा संध्या ने-पवार यांचा सत्कार
सावंतवाडी ता.२५-:* आपल्या आजूबाजूला वातावरण प्रचंड विखाराचे झाले आहे. एखाद्या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया द्यायची याचा विचार सुरु असतानाच दुसरा विखारी मुद्दा समोर आणला जातो. लव्ह जिहाद, गोमांस हे मुद्दे झाल्यावर आता भोंगा आणि हनुमान चालीसा या मुद्द्यावर वातावरण तापवले जात आहे. जेएनयुमधील मुलांनी मांस खाल्ले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. सांस्कृतिक दहशतवादाने घेरले गेलो असताना आपण एकजुटीने पण विविध पद्धतींनी आपला आवाज बुलंद करायला हवा. हे भान घेवूनच सावंतवाडीला जनवादी संमेलन होत आहे. जनवादी साहित्य संमेलन सांस्कृतिक चळवळींचे एकारलेपण दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास सावंतवाडीत होणा-या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार यांनी व्यक्त केला.
मुंबईत आयोजित जाहीर सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. सावंतवाडीत ८,व ९ मे रोजी जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार यांची निवड करण्यात आली आहे.
त्यानिमित्ताने दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती, प्रगतीशील लेखक संघ व संमेलन संयोजन समितीच्यावतीने मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत वंदना सोनाळकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपत देसाई, श्रीधर पवार, सुबोध मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संध्या नरे-पवार म्हणाल्या, आता कुणी काय खावे,कुठे रहावे काय परिधान करावे हे जाती धर्माच्या नावावर ठरवले जात आहे.
स्त्रियांना अधिकाधिक भगवीकरणाकडे ओढले जात असल्याकडे लक्ष वेधून त्यामागे राजकीय उद्देश्य आहे असे मत त्यांनी मांडले. जात वगळून स्त्रीशोषणाचा विचार करता येणार नसल्याचे प्रतिपादन यावेळी केले. आज जागतिकीकरण आणि त्यातून आलेल्या चंगळवादाचा आधार घेवून या पिढीला धर्मसत्तेकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राजकीय हिदुत्ववाद हा मुळात ब्राम्हणी हिदुत्ववाद आहे. एकीकडे धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात असताना दुसरीकडे जेम्स लेन प्रकरणावरुन बहुजनांवर हल्ला केला जात आहे. नव्वदनंतर या सांस्कृतिक प्रतिक्रांतीला सुरुवात झाली पण त्याची गंभीर दखल आपण घेतली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध मोरे यांनी केले. तर सूत्रसंचालन संध्या लगड यांनी केले. याप्रसंगी दलित पॅंथरच्या युवा कलाकारांनी शाहिरी जलसा सादर केला.
