मालवण ता.२४-:* सध्या शालेय परिक्षा संपून बालदोस्तांना उन्हाळी सुट्टी पडणार आहे. या सुट्टीचा चांगला फायदा करून घेता यावा तसेच बालसाहित्याचे मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी मालवण येथील नगर वाचन मंदिर या ग्रंथालयाच्यावतीने दि. ४ मे ते ३१ मे २०२२ या कालावधीत बालदोस्तांसाठी बाल वाङमयाचे दालन खुलं केले जाणार आहे. या संधीचा फायदा मालवण शहर व परिसरातील बालदोस्तांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. या कालावधीत बालदोस्तांच्या वाचन विषयक विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये कथाकथन, कथावाचन आदी स्पर्धा आयोजित करून बालदोस्तांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य हेतु म्हणजे बालदोस्तांना मोबाईल टिव्हीच्या आभासी दुनियेतून काही काळ का असेना बाहेर काढुन पुस्तकांच्या वास्तव दुनियेची सफर घडवून त्यांच्यामध्ये ज्ञानवृध्दी करणे हा आहे. या उपक्रमासाठी प्रवेश पुर्णतः निःशुल्क असून जास्तीत जास्त बालदोस्तांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी पालकांनी आपल्या पाल्याची नावनोंदणी ८३९०६९४३३१/ ९४२२२३४९५० या क्रमांकावर संपर्क साधून करावी असे आवाहन ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले आहे.
