डिपॉझिट बिलांची होळी करणार-प्रसन्ना देसाई

वेंगुर्ला प्रतिनिधी– महावितरणने मार्च महिन्याच्या बिलासोबत स्वतंत्र डिपॉझीटची बीले पाठविल्याने ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. व्याज व ग्राहकांच्या फायद्याचे गणित सांगून महावितरण कोट्यावधी रुपये ग्राहकांच्या खिशातून काढण्याचा कट रचला आहे. एकीकडे लाईट बिल भरणे, लाईटबील वसुली यात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल असताना तसेच वीजचोरीही सिंधुदुर्गात नसताना लोडशेडिंग करणे म्हणजेच सिंधुदुर्गवासीयांवर अन्याय आहे. म्हणूनच या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने डिपॉझीट बिलांची होळी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोनाच्या काळात २०० युनीट मोफत विज देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिलात सवलत मिळेल या भाबड्या आशेने बील भरण्यास उशीर केला आणि त्यानंतर उर्जामंत्र्यांनी घुमजाव केले. या सर्व गुंतागुंतीत बील रक्कम वाढली.

तरीही ग्राहकांनी टप्प्याटप्प्याने व्याजासह बीले भरली. कोरोनाच्या काळात ऑनलाईन बिले भरण्याच्या महावितरणच्या आवाहनाही ग्राहकांनी साथ दिली. काहींनी व्याजासह रक्कम भरून वीजपुरवठा सुरळीत ठेवला. परंतु, आता महावितरणने कोळशाचा अपुरा पुरवठा असल्याचे कारण देत ग्रामीण भागात भारनियमनाला सुरुवात केली. त्यातच जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे सिक्युरीटी डिपॉझीटची स्वतंत्र बिले पाठवली आहेत. दोन्हीही बीले एकाचवेळी आल्याने ही अतिरिक्त रक्कम ग्राहकांनी भरु नये असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page