सातार्डा भाजप शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांची मागणी
बांदा ता.२४-:* मडुरा मंगळमोड, बाबरपीर मार्गे कास बाजूने जाणारी विजेची मुख्य लाईन बरीच जुनाट झाली आहे. झाडाझुडपांतून व जंगलातून ही लाईन जात असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. भर पावसाच्या दिवसांत या वीज प्रवाहित तारांवर झाडे पडून अनेक दिवस मडुरा गावाला काळोखात सुध्दा राहावे लागले. त्यामुळे गावातील मुख्य लाइन बदलून देत वीजपुरवठा अखंडित ठेवावा अशी मागणी, भाजपा सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी सावंतवाडी महावितरण उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
गेली कित्येक वर्षे मडुरा गावातील नागरिक वारंवार होत असलेल्या वीज खंडीत प्रकारामुळे पुरते हैराण झाले आहेत. गावात वीज गुल होण्याचे प्रकार नित्याचेच बनले असून वीजग्राहकांच्या मागणीकडे महावितरणचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
गावातील मुख्य लाईनच बदलल्यास वीज समस्या काहीशा प्रमाणात कमी होतील. कारण झाडेझुडपे व जंगलातून मंगळमोड बाबरपीर मार्गे कास जाणारी मुख्य लाईन बरीच जुनाट झाली आहे. याच लाईनवरील तारांवर झाडे पडून अनेक दिवस मडुरा गावाला अंधारात राहावे लागले. जर रोणापाल श्री देवी माऊली मंदिर ते मडुरा माऊली मंदिरपर्यंत मुख्य लाइन जोडणी केल्यास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार खूप कमी होतील. त्यामुळे समस्त मडुरा गावांतील ग्रामस्थ, वीज ग्राहकांच्या मागणीनुसार आपण सदर मुख्य लाइन बदलून द्यावी अशी मागणी भाजप सातार्डा केंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी महावितरणकडे केली आहे.
