केसरी येथील ग्रामस्थांची संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
सावंतवाडी ता.२३-:* तालुक्यातील केसरी गावातील पाच मुलांकडून प्रत्येकी एक लाख रुपये घेऊन त्यांना दुबई येथे नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी त्या इस्मावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली केसरी गावातील ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केसरी येथील ५ युवकांकडून प्रत्येकी १ लाख असे एकूण ५ लाख रुपये घेऊन, त्या युवकांना दुबई येथे नोकरी लावतो असे सांगून त्यांना दुबई येथे नेले होते.
परंतु, आता त्या युवकांचा विजा संपला असून, ते ५ ही युवक संकटात सापडले आहेत. या फसवणुकी बाबत तेथील ग्रामस्थांनी आज संजू परब यांच्याकडे धाव घेतली होती. यावेळी संजू परब यांच्या नेतृत्वाखाली त्यानी या युवकांची फसवणूक करून, त्याना संकटात टाकणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. यावेळी दीपक पाटील, धोंडीराम जंगले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
