आगामी निवडणुकीत युवासेनेच्या माध्यमातून विजयश्री खेचून आणणार:सुशांत नाईक

युवा सेनेच्या माध्यमातून संघटना बळकटीवर भर

कणकवली ता.२०-:* युवासेनेच्या जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यानी युवा सेनेच्या माध्यमातून संघटना बळकटीवर भर दिला आहे. युवा सेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर सुशांत नाईक यांनी कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात युवासेनेची मजबूत फळी उभारण्यास सुरूवात केली आहे . त्यानुसार प्रत्येक जि . प . मतदारसंघनिहाय युवासेना विभाग प्रमुख नियुक्तीही पूर्णत्वास येत आहे . येऊ घातलेल्या जि . प . व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने युवासेनेच्या माध्यमातून विजयश्री खेचून आणण्याचे नियोजनही करण्यात येत आहे . युवासेनेच्या माध्यमातून जि . प . मतदारसंघनिहाय बैठकाही अंतिम टप्प्यात असल्याचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले .

कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक व विरोधी पक्ष गटनेते असलेल्या सुशांत नाईक यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदी विजय मिळविल्यानंतर त्यांच्यावर युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून कणकवली – देवगड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे . युवासेनेची जबाबदारी मिळताच त्यांनी प्रत्येक जि .प . मतदारसंघनिहाय बैठकांचे आयोजन केले . काही ठिकाणी गावनिहाय बैठकाही झाल्या .

जवळपास सर्व जि . प . मतदारसंघांचा दौरा पूर्ण करत विभागप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे . प्रत्येक जि . प . मतदारसंघात विभाग प्रमुखांची नियुक्ती करताना कार्यरत नसलेल्या ठिकाणी किंवा काही अन्य ठिकाणी नवीन पदाधिकारी नियुक्तीही करण्यात आली . तसेच अनेक गावांमध्ये युवासेनेच्या शाखाप्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली आहे . एकीकडे संघटना बांधणी करत असताना दुसरीकडे संघटनेच्या माध्यमातून तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हॉलिबॉल व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले . तसेच काही मोठ्या शहरांसहीत छोट्या शहरांमध्येही शहरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे .

युवा सेनेच्या माध्यमातून काम करताना सध्या सुरू असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुकीत युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाल्याचे यातून दिसून आले . गावपातळीवर युवासेना व बेसीक संघटनेचा ताळमेळ घालत सुरू करण्यात आलेल्या कामाचे यशात रुपांतर होत असल्याचे नाईक म्हणाले . हे करत असनाता नाईक यांनी युवासेनेची सोशल मीडिया टीमही तयार केली आहे . यासाठी विधानसभा प्रमुख म्हणून विठोबा गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

तसेच तालुका पदाधिकारीही लवकरच नियुक्ती होतील . तसेच युवासेनेसोबतच युवतीसेनाही मजबूत करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे . लवकरच या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर होतील , असेही नाईक यांनी सांगितले . शिवसेनेसोबत या मतदारसंघात युवासेना खांद्याला खांदा लावून काम करत असून सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये हे दिसून आले आहे . येऊ घातलेल्या जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये युवा सेना पूर्ण क्षमतेने काम करणार आहे . त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा विजय निश्चित आहे . युवासेनेच्या माध्यमातून आपली नियुक्ती झाल्यानंतर सुमारे अडीज ते तीन महिन्यांत आपण युवासेनेची फळी भक्कम करण्यासोबतच ती अॅक्टीव्हही करण्यावर भर दिला आहे . पुढील काळात युवासेना अधिक जोमाने काम करताना दिसून येईल , असेही नाईक म्हणाले .

You cannot copy content of this page