शासकीय तंत्रनिकेतन मधील समस्या सोडविल्याने प्राचार्यांचा मातृत्व आधार फाउंडेशनने केला सत्कार…

मालवण (प्रतिनिधी) मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आठ दिवसांत दूर केल्यास जाहीर सत्कार करू असे सांगणाऱ्या मालवणच्या मातृत्व आधार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज शासकीय तंत्रनिकेतनला भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व प्राध्यापक वर्गाचा सत्कार केला.

मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतन प्रशासनाने विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा देतानाच कोणत्याही समस्या भेडसावू नयेत याची काळजी घ्यावी, यासाठी मातृत्व आधार फाउंडेशनचे सहकार्य लाभेल असे यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांना अपुरा पाणी पुरवठा तसेच लाईट व फॅनची पुरेशी व्यवस्था नसणे या समस्या भेडसावत होत्या. याबाबत तंत्रनिकेतन प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थ्यांनी मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे लक्ष वेधले होते.

त्यामुळे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तंत्रनिकेतन मध्ये धडक देऊन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्याशी चर्चा करत आठ दिवसात समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिला. तसेच समस्या सोडविल्यास सत्कारही करू असा शब्दही दिला होता. संस्थेच्या इशाऱ्यानंतर तंत्रनिकेतन प्रशासनाने गेल्या आठ दिवसात तंत्रनिकेतन मधील विद्यार्थी राहत असलेल्या खोल्या तसेच वर्ग खोल्यातील वीज दुरुस्ती तसेच फॅन बसविण्याची कामे मार्गी लावली.

तसेच पाणी पुरवठा प्रश्नासंदर्भात तंत्रनिकेतन परिसरातील बोअरवेल दुरुस्त करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शासकीय तंत्रनिकेतन प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या समस्या दूर केल्याने मातृत्व आधार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज शासकीय तंत्रनिकेतनला भेट देऊन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्यासह प्रा. डॉ. संजय चोपडे, प्रा. डॉ. योगेश महाडिक, प्रा. सेमय तलवारे, प्रा. दिपक बढेकर, प्रा. दत्तप्रसाद गोलतकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेने देखील आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावे असे यावेळी प्राचार्य डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, संस्थेचे सचिव विश्वास गावकर, जयश्री हडकर, विनोद भोगावकर, दादा वेंगुर्लेकर, प्रभूदास आजगावकर, संदीप नेवाळकर, देवानंद लुडबे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page