एसटी कर्मचाऱ्यानी विलिनीकरणाचा भूलभुलैया विसरून कामावर रुजू व्हावे:मोहन केळुसकर

कणकवली ता.१५-:* एसटी कर्मचाऱ्याचे स्वंयम घोषित नेते अॕड. गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचार्यांची दिशाभूल करुन एसटीचा संप साडेपाच महिने चिघळवून ठेवला. आता त्यांची न्यायालयीन फरफट उभा देश अनुभवतो आहे. कर्मचार्यांनी आता झाले गेले ते दु:स्वप्न विसरून जावे. राज्यातील प्रवाशाची जीवनवाहिनी असलेली एसटी जगली पाहिजे आणि कर्मचार्यांचे कुटुंबही जगले पाहिजे. भाजप पक्षाचे धोरण हे खाजगीकरणाच्या दिशेने चालले आहे.

तेव्हा आता एसटी कर्मचाऱ्यानी विलिनीकरणाचा भूलभुलैया विसरून तातडीने कामावर हजर व्हावे, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, एस. टी. प्रवासी संघटनेचे प्रवर्तक मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे. कोविआच्या माध्यमातून गेली ४४ वर्षें आम्ही एसटी महामंडळ ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. अनेक सकारात्मक उपाय सुचवित आलो आहोत. मात्र सत्तेत येणार्या प्रत्येक राजकारण्यांना एसटी हे चराऊ कूरण ठरले आहे, असा आरोप करून ते म्हणतात, कामाच्या मानाने एसटी कर्मचार्यांना मिळणारे वेतन हे असमाधानकारक आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही.

मात्र त्यांचा हा विलनिकरणाचा हा लढा चुकीच्या गृहतिकावर लांबला. त्यांच्या नेत्तुत्वाने त्यांची दिशाभूल केली. त्यांच्या या लढ्याला विद्यमान राज्यकर्त्यांनी नाकारले. तसेच विरोधी भाजप पक्षानेही हा लढा गंभीरतेने घेतला नाही. किंबहुना भाजपाचा हा पक्ष खाजगीकरणाच्या बाजूने निर्णय घेत असतो. या कर्मचाऱ्याना चिथावण्याचे काम करुन स्वत:ची पोळी भाजण्याचे काम केले गेले.

अभ्यासू नेतृत्व नसल्याने कामगार भरडला गेलाच. या लढ्यामुळे महाराष्ट्रातील व्यापार उद्दीमावर विपरित परिणाम झाला. विद्यार्थ्यांना खूप किमंत मोजावी लागली. दुर्दैवाने त्याचे कोणालाही सोयरसुतक वाटले नाही. आता कर्मचाऱ्यानी आपली ही लालपरी पुन:श्च जोमाने उभी राहण्यासाठी कंबर कसली पाहिजे. सत्ताधिशांनीही एसटीला पुर्वीचे सुगीचे दिवस आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले पाहिजे, असेही केळुसकर यांनी या पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page