फोंडाघाट येथील व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
कणकवली ता.१६-:* आपले कोण आणि परके कोण हे ओळखू न येणाऱ्या काळात आंबेडकर विचार अधिक दिशादर्शक ठरणार आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकरांसह बहुजनांच्या या नायकांना आता जाती धर्माचे राजकारण करणारेही आपले मानू लागले आहेत. हे त्यांचं सांस्कृतिक- सामाजिक राजकारण असून हे राजकारण वेळीच ओळखले नाही तर निखळ माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला भविष्यात जगणं मुश्कील होईल असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी फोंडाघाट येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात केले.
फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौध्द महासभा फ़ोडाघाट शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती अपूर्व सोहळ्याने आयोजित करण्यात आली, यावेळी ‘अनुकरणातील बाबासाहेब’ या व्याख्यानात बोलताना श्री कांडर यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करणे म्हणजेच बाबासाहेबांच्या विचाराने पुढे जाणे होय असेही आग्रहाने सांगितले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा लेखक संजय तांबे,सचिव सतीश कदम,मिलिंद जाधव, संतोष कदम,प्रा. विनोदसिंह पाटील, प्रा.जगदीश राणे, प्रा.संतोष जोईल, प्रा तुषार नेवरेकर, साहित्यिक राजेश कदम, आनंद तांबे आदी उपस्थित होते.
श्री कांडर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा साजरा करणे ही अभिमानाची गोष्ट असते. त्यामुळे यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जायलाच हवे मात्र हे करताना आपण बाबासाहेबांच्या विचारातून पुढे जाण्याची इच्छा बाळगून त्या विचारांचे अनुकरण आपल्या जगण्यात सतत होत राहिला पाहिजे. यासाठी जयंती सोहळा हा या निमित्ताने स्वतःच्या आत्मपरीक्षणाचा एक महत्त्वाचा क्षण असतो हेही लक्षात घ्यायला हवे. जगातील काही ठराविक विचावंतापैकी बाबासाहेब हे एक असून त्याचं मोल जर आपण समजून घेतले तर बाबासाहेबांनी आपल्याला आपलं जगणं समृद्ध करण्याचा कोणता विचार दिला आहे हे लक्षात येईल. दुर्दैवाने जाती आणि धर्माचं राजकारण करून सत्तेवर आलेली व्यवस्था आणि त्यांचे पाठीराखे बाबासाहेबांसह बहुजनांच्या सर्वच नायकांना आपलेसे करण्याचे नाटक करून बहुजनांशी डाव खेळत आहेत. हे जर वेळीच ओळखलं नाही तर भविष्यात शोषित उपेक्षित घटकांना जगणं मुश्कील होईल.
बाबासाहेबानी घटनेच्या माध्यमातून या देशातील सर्व जाती समूहातील महिलांना स्वातंत्र्य दिले. स्त्री आणि पुरुष यांना समनता दिली. मात्र आपण या समानते पासून कोसो मैल दूर गेलो असून आपल्या रोजच्या जगण्यात स्त्रीला किती संन्मानित करतो याचंही आत्मपरीक्षण करायला हवे. बाबासाहेबांनी व्यसनापासून दूर रहा असे सांगितले पण सर्व समाजातील व्यसनाधिनता वाढीस लागली असून यामुळे सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे जयंती उत्सव साजरा करतानाच बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करून आपल्यातले मानव्यपण शाबूत ठेवणे आज अधिक गरजेचे झाले आहे. दरम्यान फोंडाघाट सिद्धार्थनगर ते एस. टी. स्टॅन्ड पर्यन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगावान बुद्ध यांच्या प्रतिमाची मिरवणूक काढण्यात आली.मिलिंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संतोष कदम यांनी आभार मानले.
