जुन्या रुढीमध्ये न अडकता बाबासाहेबांच्या मार्गाचा अवलंब करा-डॉ.गाधाडे

वेंगुर्ला ता.१५-:* लढायचं असेल तर संसदेत जाऊन लढा मंदिरामध्ये जाऊन तुमचा उद्धार होणार नाही. कारण, भारतामध्ये कुत्र्या मांजराला किंमत आहे पण आपल्या समाजाला किंमत नाही. या जुन्या रुढीमध्ये न अडकता बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर चालल्यास निश्चित तुमचा उद्धार आहे असे प्रतिपादन डॉ.प्रज्ञाकुमार गाधाडे यांनी वेंगुर्ला येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वेंगुर्ला तालुका व शहर समिती, आनंदवाडी वेंगुर्ला सावित्रीबाई फुले महिला मंडळ, आनंदवाडी वेंगुर्ला बौद्ध हितवर्धक मंडळ मुंबई शाखा वेंगुर्ला तालुका व दलित समाज सेवा मंडळ आनंदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१व्या जयंती उत्सव सोहळ्याचे साई मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. जाहीर अभिवादन सभेचे उद्घाटन डॉ.प्रज्ञाकुमार गाधाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर उत्सव समिती अध्यक्ष अमोल जाधव, उपाध्यक्ष मधुकर जाधव, बौद्ध हितवर्धक मंडळ शहर अध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित समाजसेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्ष सुहानी जाधव, शाहू फुले आंबेडकर विचारमंच अध्यक्ष जयप्रकाश चमणकर आदी उपस्थित होते.

डॉ.गाधाडे पुढे बोलताना म्हणाले की, सध्या देशामध्ये जातीपातीचे राजकारण केले जात आहे. कामगारांचे हक्क डावलले जात आहेत, खाजगिकरणामुळे युवक देशोधडीला लागला आहे. युवकांचे प्रबोधन करण्याचे काम केले तरच ख-या अर्थाने आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल. संपूर्ण भारत बौद्धमय करण्यापेक्षा संपूर्ण आंबेडकर अनुयायी बौद्धमय झाल्यास मोठी क्रांती होऊ शकते. असे त्यांनी सांगितले.

डॉ.अश्विनी माईणकर, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.पूजा कर्पे, डॉ.मानसी सातार्डेकर, सुधीर पालयेकर, प्रितम सावंत यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गीतांजली जाधव, यशस्वर जाधव, विणा जाधव, प्रणिता जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत, वाज.जी.कदम यांनी प्रास्ताविक, किरण जाधव यांनी सूत्रसंचालन तर विठ्ठल जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सुभाष जाधव, जयंत जाधव, गौतम जाधव, विकास जाधव, मयुरेश कदम, किरण जाधव, वामन कांबळे, गजानन जाधव, आर.के.जाधव, लवू तुळसकर, अॅड. मनीष सतार्डेकर, महादेव नाईक आदींसह आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page