*⚡मालवण ता.१४-:* कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी पिंपळाच्या पानात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र कोरुन आपल्या कलेतून अनोख्या पद्धतीने महामानवास अभिवादन केले. उत्तम चित्रकार आणि रांगोळीकार असणाऱ्या समीर चांदरकर यांनी आजपर्यंत विविध प्रकारची चित्रे व रांगोळ्या साकारत राज्यपातळीवर सुयश मिळविले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून समीर चांदरकर यांनी पिंपळाच्या पानात कोरीव कामाद्वारे डॉ. आंबेडकर यांची ही कलाकृती साकारली आहे. जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांना या कलाकृतीतून चांदरकर यांनी मानवंदना दिली आहे. नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सहज आणि अप्रतिम कलाकृती साकारता येऊ शकते असा संदेश चांदरकर यांनी आपल्या कलेतून नव्या कलाकारांना दिला आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
