ग्रामस्थांनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांची भेट.
मालवण ता.११-:* मालवण तालुक्यातील असगणी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगणी नं. १ या शाळेत पुरेशी पटसंख्या असतानाही शाळेत फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहेत मालवण तालुक्यात विशेषतः असगणीच्या परिसरातील कमी पटसंख्या असणाऱ्या काही शाळांमध्ये चार ते पाच शिक्षक दिले आहेत मात्र, अजगणी शाळेतच कमी शिक्षक कार्यरत असल्याने मुलांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करीत असगणीचे माजी उपसरपंच आणि शिवसेना ग्राहक सरंक्षण कक्षाचे मालवण तालुका प्रमुख दिपक उर्फ बंडू चव्हाण यांनी प्रशासनाने या शाळेवर तातडीने शिक्षक द्यावा तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जून महिन्यापासून या शाळेत चार शिक्षक द्यावेत अशी आग्रही मागणी मालवणचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्याकडे भेट घेऊन केली. यावेळी अजगणी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा कासले यांनी शिक्षक मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव दिले.
गेले काही वर्ष असगणी प्राथमिक शाळा नं १ येथे पुरेशी शिक्षक संख्या नसल्याने मुलांची शैक्षणिक परवड होत आहे याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाने शिक्षक न दिल्याने संतप्त बनलेल्या असगणी गावच्या ग्रामस्थांनी मालवणचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांची भेट घेतली. असगणी येथील प्राथमिक शाळेत प्रशासनाने शिक्षक द्यावेत या मागणीसाठी ग्रामस्थांसमवेत महिला वर्गांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सरपंच हेमंत पारकर, माजी उपसरपंच सुचित्रा कासले, ग्रा. प. सदस्य अर्पिता पुजारे, बंडू कासले, प्रकाश कासले, गणेश मिसाळ, गीतांजली चव्हाण, समिधा घाडीगांवकर, सारिका पुजारे, प्राची कासले हे उपस्थित होते.
यावेळी असगणी गावचे ग्रामस्थ, माजी उपसरपंच दिपक उर्फ बंडू चव्हाण यांनी असगणी येथील ग्रामस्थांवर शिक्षक न दिल्याने प्रशासन अन्याय करीत असल्याचे सांगत प्रशासनाच्या या कृतीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी श्री. चव्हाण यांनी असगणी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून शाळेची पटसंख्या २९ आहे. या शाळेत सेमि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. या शाळेत तीन शिक्षण कार्यरत असल्याचे दाखविण्यात आले असले तरी दोनच शिक्षक कामावर आहेत तर एक शिक्षक कामगिरी वर आहे. कामगिरी वर असलेल्या शिक्षिका शाळेच्या पटावर असल्याने व सतत गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
किर्लोस आंबवणे येथील शाळेत फक्त काही मोजकी मुले आहेत तेथे पाच शिक्षक आहेत. जून पर्यंत आम्हाला चार शिक्षक देण्यात यावेत अशी आग्रही मागणी श्री. चव्हाण यांनी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ही गटविकास अधिकाऱ्यां समोर तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी गटविकास अधिकारी जाधव यांनी सद्यस्थितीत एक शिक्षक देण्याचे मान्य करून पुढील शैक्षणिक वर्षात पुरेसे शिक्षक देण्याची ग्वाही दिली.
