डेप्युटी सीईओ दीपाली पाटील यांची कोल्हापूर येथे बदली

पर्यायी अधिकारी शासनाने नाही दिला;परिणामी पदभार प्रभारीकडे

*⚡ओरोस ता.०८-:* जिल्हा परिषद ग्राम पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांची कोल्हापूर येथील शासनाच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी शासनाने दुसरे अधिकारी नियुक्त केलेले नाहीत.

दरम्यान, सौ पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी कार्यमुक्त केले असून त्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. ग्रामपंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांची जळगाव येथे बदली झाल्यानंतर २१ ऑगस्ट २०१९ रोजी दीपाली पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत हजर होत या पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात क वर्ग पर्यटनस्थळ विकास, नागरी सुविधा, जनसुविधा या योजना राबविल्या गेल्या. परंतु पालकमंत्री व जिल्हा परिषद सत्ताधारी वादामुळे या योजना गतीने पूर्ण होऊ शकल्या नाहीत. परिणामी योजनांसाठी जिल्हा नियोजन मधून प्राप्त निधी अखर्चित राहिल्याने हा निधी शासनाला परत पाठविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. आता अलीकडे हा निधी पुन्हा उपलब्ध झाला आहे. मात्र, तो खर्च करण्यापूर्वी दीपाली पाटील यांची बदली झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पदभार स्वीकारून तीन वर्षे उलटली नसताना दीपाली पाटील यांनी शासनाकडे विनंती बदली मागितली होती. शासनाने त्यांच्या विनंतीचा विचार करून ८ मार्च रोजी कोल्हापूर येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून बदली केली आहे. आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी त्यांना कार्यमुक्त केले आहे.

यानिमित्त त्यांना निरोप देण्यात आला. भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीईओ नायर, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर आदी उपस्थित होते. दीपाली पाटील यांच्या जागी शासनाने नवीन अधिकारी दिलेला नसल्याने या पदाचा पदभार विनायक ठाकूर यांच्याकडे देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page