कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मिळतो अपुरा आहार

प्रशासन करते डोळेझाक; शैलेश भोगले यांनी विचारला जाब

कणकवली ता.०८-:* कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना देण्यात येणारा आहार अपुरा मिळत असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी सांगितले .शैलेश भोगले हे कणकवली उपजिल्हारुग्णालयात सकाळच्या दरम्यान एका रुग्णाला भेटायला गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

या संबंधी आहाराबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आहार तज्ञ यांनी रुग्णांना मिळणारा आहार हा कमी मिळत असल्याचे कबुल करत ही बाब ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिली असल्याचेही सांगितले आहे तरीदेखील ठेकेदाराने त्यावर कोणतीही उपाययोजना केली नाही असे शैलेश भोगले यांना सांगितले यावेळी शैलेश भोगले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी संपर्क साधला. सदरच्या ठेकेदारामुळे रुग्णालय व पर्यायाने राज्य सरकार विनाकारण बदनाम होत असते. या प्रकारात वेळीच सुधारणा करा. अन्यथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही शैलेश भोगले यांनी दिला. तसेच कणकवली रुग्णालयाला भेट देऊन वस्तुस्थिती तपासा, असेही ते पाटील यांना म्हणाले..

दरम्यान रुग्णालयातील एक वैद्यकीय तज्ज्ञ रजेचा अर्ज न देताच रजेवर गेले आहेत. परिणामी रुग्णांची हेळसांड होत असल्याचेही भोगले यांनी निदर्शनास आणले. मात्र, याबाबत सदरच्या वैद्यकीय तज्ज्ञास नोटिस पाठविण्यात आल्याचे डॉ. शिकलगार यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणारे जेवण ,नाश्ता ,दूध ,चहा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी ठेकेदाराला शासन निर्णयानुसार मोजमाप दिले आहे. पण त्या जीआर नुसार ठेकेदार रुग्णांना जेवण पुरवत नसल्याचे दिसले व त्या जेवणामध्ये बऱ्याच गोष्टींची कमतरता असल्याचे दिसल्याने शैलेश भोगले यांनी यासंबंधी आवाज उठवला असून पालकमंत्र्यांना या संबंधित कारवाई करण्यास सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page