कणकवली ता.०८-:* डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२२ रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती निमित्ताने पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण – तळेरे प्रभागातील जि प शाळांमधील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष संतोष यशवंत पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गेली दोन वर्षे कोरोना सारख्या जागतिक महामारीमुळे साजरी करता आली नव्हती. मात्र यावर्षी सर्वत्रच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साही वतावरणात साजरी करण्यात येणार असून खारेपाटण पंचशील नगर येथे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेली ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा १३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८ते १ या वेळेत जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे घेण्यात येणार असून तळेरे प्रभागातील खारेपाटण, शेर्पे,साळीस्ते व कासार्डे आदी चार प्रमुख केंद्रातील इयत्ता ५ वी चे विदयार्थी या शिष्यवृत्ती सराव परीक्षेस बसणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणांत विद्यार्थ्यांना १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पंचशील विकास मंडळ खारेपाटणच्यावतीने पंचशील नगर खारेपाटण येथे सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम स्थळी पुष्पगुच्छ, गुणपत्रक,प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.
तरी तळेरे प्रभागातील येणाऱ्या सर्व शाळातील इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा लाभ घ्यावा.असे आवाहन पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
