दोन घरांचे सुमारे ६० हजारांचे नुकसान : विजेचा खेळखंडोबा सुरूच
वेंगुर्ले प्रतिनिधी वेंगुर्ले येथे आज सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत. तसेच विजेचा खेळखंडोबा सुरूच असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील दोन घरांचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.
वेंगुर्ले तालुक्यात ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट करत मंगळवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला.
या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी आपल्या घरांची कामे सुरू केली असल्यामुळे त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले. वादळी वाऱ्यामुळे बागांमधील बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून नुकसान झाले आहे. वीज वितरण च्या तारांवर झाडे तुटून पडल्यामुळे कालपासून तालुक्यातील वीज पुरवठा विस्कळीत आहे. खानोली गावातील विलास गोविंद मांजरेकर यांच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मळई येथील नंदकिशोर बापू पालकर यांच्या घराचे अतिवृष्टीने सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
