बांदा ता.०२-:* रोणापाल आंब्याचे गाळू येथे जाणाऱ्या रस्त्यावर श्री देव खडपकर ठिकाणी पावसाळ्यात संरक्षक भिंती अभावी स्थानिकांना पुराचा सामना करावा लागत होता. दोन वेळा मातीचा भरावही वाहून गेला. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल आम्ही घेतली आहे.
रोणापाल गाव एकजुटीने आमच्यासोबत राहिल्यास गावात प्रत्येक विकासकामाला शिवसेनेच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ, अशी ग्वाही शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी दिली. आंब्याचेगाळू येथील श्री देव खडपकर येथे आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून संरक्षक भिंतीचे भूमिपूजन करताना श्री.राऊळ बोलत होते.
या वेळी पंचायत समिती माजी सदस्य बबन राणे, शिवसेना इन्सुली विभागप्रमुख फिलिप रॉड्रिग्स, शाखाप्रमुख मंगेश गावडे तसेच सचिन पालव, रघुवीर देऊलकर, शिवा नाईक व ग्रामस्थ तसेच मक्तेदार अभिषेक देऊलकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी जावे लागते. तसेच बांदा बाजारपेठ गाठण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. दुचाकी, चारचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागते. येथून रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची व एक जादा मोरी पाईपची आवश्यकता असल्याची बाब शाखाप्रमुख मंगेश गावडे यांनी तालुका प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. रोणापाल गाव पूर्णपणे आमच्या सोबत राहिल्यास गावाचा विकास निश्चित आहे असे सांगत सदर संरक्षक भिंतीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजन परब यांनीही पाठपुरावा केला असल्याचे बबन राणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गावडे यांनी तर आभार बबन राणे यांनी मानले.
