भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल रोजी होणार कार्यक्रम
सावंतवाडी ता.३१-: भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर व कथकनृत्य पंडित बिरजू महाराज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी पंचम खेमराज महाविद्यालयात शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव व सत्कार देखील करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या कार्यक्रमाला माजी आमदार राजन तेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
तसेच सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक सदस्य रवींद्र मडगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कलानिकेतन चे उपाध्यक्ष उमाकांत वारंग, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे आणि कलानिकेतनच्या शास्त्रीय कथक नृत्य शिक्षिका प्रीती डिसोजा यांनी केले आहे.
