युवासेना सातार्डा उपविभाग प्रमुख प्रवीण परब यांचा राजीनामा

बांदा ता.३१-:* खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेले आणि त्यानंतर सातार्डा युवासेना उपविभागप्रमुख पदाची धुरा सांभाळणारे प्रवीण ऊर्फ पिंट्या परब यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा युवासेना सावंतवाडी अधिकारी यांच्याकडे दिला. सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात, तसेच सर्व निवडणुकांत बहुमोल अशी भूमिका बजावलेले पिंट्या परब यांनी राजीनामा दिल्याने आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय क्षेत्रात एकच चर्चा सुरू आहे.

दरम्यान, प्रवीण परब बोलताना म्हणाले की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना केवळ निवडणुका डोळ्यासमोर आल्या की पदाधिकाऱ्यांची आठवण येते. संघटना वाढीसाठी कोणताही प्रयत्न न करता केवळ निवडणुकीपुरती आमची आठवण येते असे श्री. परब म्हणाले.

सातार्डा विभागात निवडणूक काळात खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले. परंतु ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपणाला सामोरे जावे लागत आहे. परंतु वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा नसल्याची खंत व्यक्त करत पिंट्या परब यांनी आपली नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संघटना वाढीसाठी ग्रामीण भागातील युवा पदाधिकाऱ्यांना बळकटी देणे आजही अपेक्षित आहे आणि तरच पक्ष संघटना मजबूत राहील असे ते म्हणाले. सध्या तरी आपणास कोणतेही पद नको आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रविण परब भविष्यात कोणत्या पक्षात जाणार का अन्य क्षेत्रात जाणार याकडे राजकीय वर्तुळातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page