मालवण शहरातील प्रलंबित पर्यटन प्रकल्प मार्गी लावावेत

महेश जावकर यांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

मालवण ता.२८-:* मालवण शहरातील महत्वाचे पर्यटन प्रकल्प मार्गी लावण्यात लावून येथील पर्यटन विकासाला चालना द्यावी, अशी मागणी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण भेटीवर आलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची महेश जावकर यांनी भेट घेत मालवणातील पर्यटन प्रकल्पांबाबतचे निवेदन सादर केले.

मालवण शहरातील प्रलंबित मेढा राजकोट येथील मच्छीमार जेटी विकसित करण्यात यावी. मालवण बंदी जेटी ते राजकोट बंधारा कम रस्ता तयार करणे, राजकोट ते निशाण काठी पर्यंत बंधारा कम रस्ता तयार करणे, राजकोट येथील निशाण काठी हा परिसर पर्यटनातून विकसित करणे आदी विविध मागण्या महेश जावकर यांनी या निवेदनातून केल्या आहेत. पर्यटन मंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पर्यटनाचा विकास करण्याचा ध्यास ना. ठाकरे यांनी घेतलेला आहे. तसेच प्रलंबित पर्यटन प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आम. वैभव नाईक हे देखील पाठपुरावा करत आहेत. सदर पर्यटन प्रकल्प मालवणच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळे याबाबत जातीनीशी लक्ष घालून मालवण शहरातील पर्यटन विकासाला चालना द्यावी अशी मागणी महेश जावकर यांनी ना. ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page