स्वामी राज प्रकाशन संस्थेतर्फे ” मराठी आठव दिवस” उपक्रम

कणकवली ता.२८-:* स्वामी राज प्रकाशन या संस्थेच्या वतीने ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथे पहिला कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापुरातील मराठी शाळेत शिकणाऱ्या रचना कोडलिकर, सारिका राठोड आणि झोया मुजावर या तीन अमराठी विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला.

कोल्हापुरातील नामवंत उद्योजक ‘ बालाजी कलेक्शन ‘ चे प्रमुख प्रशांत पोकळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बापू निगवेकर यांचे सहकार्य लाभले. केवळ वर्षभरात एकदाच मराठीची आठवण काढून उपयोगी नाही. वर्षभर मराठीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. स्वामी राज प्रकाशन या संस्थेचे म्हणूनच कौतुक आहे. संस्थेने मराठी भाषेसाठी, तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी जे कार्य हाती घेतले आहे त्याची दखल राज्याच्या मराठी भाषा विभागाने घ्यावी अशी अपेक्षा यावेळी बालाजी कलेक्शन चे प्रमुख प्रशांत पोकळे यांनी व्यक्त केली.

यावेळी स्वामी राज प्रकाशनच्या संचालिका रजनी राणे, प्रकाश पोकळे, पल्लवी फाऊंडेशनचे सदस्य मोहन ठाकूर , अरविंद माजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी आपण ” मराठी भाषा गौरव दिवस ” मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र त्यानंतर वर्षभर काय ? या प्रश्नाचे उत्तर मात्र सापडत नाही. ‘ स्वामीराज प्रकाशन ‘ या संस्थेच्या वतीने उत्तर शोधण्याचा छोटासा प्रयत्न केला असून दर महिन्याच्या २७ तारखेला ‘ मराठी आठव दिवस ‘ साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिवशी कुठल्याही शहरात, गावात ” मराठी ” साठी एक उपक्रम राबवला जाईल. एप्रिल महिन्यातील कार्यक्रम कणकवली येथे होणार आहे.

You cannot copy content of this page