वेंगुर्ला ता.२८-:* न्यायाची चाड व अन्यायाची चीड, त्याग आणि सेवा या तत्वाला अनुसरून चालणारी, विविध शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना शाखा वेंगुर्ला यांचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. यावेळी गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
येथील साई मंगल डिलक्स हॉल येथे आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिक्षक समितीचे संस्थापक भा.वा.शिंपी गुरुजी, जॉन रॉड्रिग्ज गुरुजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, राज्य महिला सल्लागार सुरेखा कदम, जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सल्लागार दिलीप प्रभूखानोलकर, जिल्हा सचिव सचिन मदने, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, आनंद पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार राणे, तालुकाध्यक्ष संतोष परब, शिक्षक नेते प्रमोद गावडे, कृषी मित्र बाळकृष्ण गाडगीळ, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षा नीलम बांदेकर आदी उपस्थित होते.
शिक्षक समिती वेंगुर्ला मार्फत मागील ३ वर्षात विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धांमध्ये यश प्राप्त करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षक समितीच्या ध्येय धोरणांना अनुसरून वाटचाल करणारे तसेच शिक्षक समितीचे सच्चे पाईक, सेवानिवृत्त शिक्षक यांचा सन्मान सोहळा आणि शिक्षक समितीने वेळोवेळी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये कार्य केलेल्या शिक्षक समितीच्या शिलेदारांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
शिक्षक समितीचे प्रेरणादायी कार्य, समितीचा जाज्वल्य इतिहास, ध्येयधोरणे यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले. मागील चार वर्षांतील शिक्षक समिती कार्याचे अहवाल वाचन सचिव सिताराम लांबर यांनी केले.याप्रसंगी शिक्षक समितीचे प्रेरणादायी कार्यपद्धती तसेच ध्येय धोरणाने प्रेरित होऊन कालिदास खानोलकर, संगीता खानोलकर, शमिका आंगणे, संतोष बोडके यांनी शिक्षक समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या अधिवेशनामध्ये शिक्षक समिती वेंगुर्लाच्या नूतन कार्यकारिणीत सिताराम लांबर (अध्यक्ष) व प्रसाद जाधव (सचिव) तर महिला आघाडीमध्ये लीना नाईक (अध्यक्ष) व नेहा गावडे (सचिव) यांचा समावेश आहे. यावेळी लकी ड्राॅमधील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालक, विद्यार्थी, सर्व तालुकाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष संतोष परब यांनी तर सूत्रसंचालन सीताराम नाईक व ऋतिका राऊळ यांनी केले. भाऊ आजगांवकर यांनी आभार मानले.
