नारळ उत्पादनासाठी पंचसूत्री अंमलात आणा-डॉ.दिलीप नागवेकर

वेंगुर्ला ता.२७-:* नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळाचे उत्पादन कसे वाढवता येईल या दृष्टीने नारळाच्या जाती, नारळाच्या दोन झाडांमधील अंतर, खते व पाणी व्यवस्थापन, नारळाच्या बागेमध्ये आंतरपिक लागवड, पीक संरक्षण ही पंचसूत्री अंमलात आणणे आवश्यक आहे. रासायनिक खताबरोबर शेणखत, कंपोस्ट खत तसेच आवश्यक तेवढेच पाणी देणे गरजेचे आहे. नारळाच्या बागेमध्ये विक्रीयोग्य अशी भाजीपाला, अननस, केळी वगैरे आंतरपिकेही घ्यावीत तसेच नारळमित्र प्रशिक्षण घेऊन काम केल्यास रोजगार उपलब्ध होऊ शकेल असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.दिलीप नागवेकर यांनी केले.

नारळ विकास मंडळ कोची (राज्य केंद्र ठाणे), महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था वेंगुर्ल आणि भारत अॅग्रो सव्र्हिसेस कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या संस्था येथे २६ मार्च रोजी नारळ उत्पादकता कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन व चर्चासत्र पार पडले. उद्घाटन लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. पूजा कर्पे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे, काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.दिलीप नागवेकर, कॉयर बोर्डाचे रिजनल मॅनेजर श्रीनिवास बिटलिंगू, क्वायर बोर्डचे हर्षवर्धन, उद्योजक उमेश येरम, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विजय देसाई, कॉयर बोर्डाचे राजेंद्र, भारत अॅग्रोचे चेअरमन भोसले, नारळ उत्पादक शेतकरी समिर खानोलकर, कॉयर बोर्डाचे अधिकारी देविदास साखरे तसेच महिला काथ्या संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, नारळ बोर्डाचे रुपेश तांबडे, धर्माजी बागकर, सावित्रीबाई फुले संस्थेच्या चेअरमन प्रविणा खानोलकर, सनराईज कॉयर क्लस्टरच्या श्रुती रेडकर, मालवण पेंडूर क्लस्टरच्या अश्विनी पाटील, सुरंगी महिला संस्थेच्या सुजाता देसाई आदी उपस्थित होते.

काथ्या उद्योगधंद्यासाठी मोठा वाव असून देवगड हापूस आंब्याप्रमाणे काथ्यालाही मागणी येणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शासनाच्या वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये आपले उत्पादन त्याठिकाणी पोहचविणे आवश्यक असल्याचे क्वायर बोर्डच्या हर्षवर्धन यांनी सांगितले.

नारळ बोर्ड व कॉयर बोर्ड या दोघांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. नारळ शेतीसाठी सिंधुदुर्गात मोठा वाव असून व्यावसायीकदृष्ट्या या उत्पादनाचा विचार व्हावा. चांगले नारळ उत्पादन झाल्यास चांगल्या प्रतीचा काथ्या उपलब्ध होऊ शकेल, असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.

कोकणातील पाचही जिल्ह्यात काथ्या उद्योग वाढीसाठी कॉयर बोर्ड तत्पर आहे. काथ्या प्रशिक्षण, काथ्या उद्योग मार्गदर्शन कॉयर बोर्डच्या माध्यमातून सातत्याने दिले जाते. पंतप्रधान रोजगार योजनेतून उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची जबाबदारी क्वायर बोर्ड घेत असल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले. यावेळी डॉ. विजय देसाई यांनी नारळावरील कीड व रोग व्यवस्थापन याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. उद्योजक उमेश येरम यांनीही नारळ लागवडीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नारळ उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page