सावंतवाडी ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या ५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या पाचही जणांची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवीसाठी गणित प्राविण्य परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षीही कोरोनामुळे परीक्षांपासून वंचित राहिलेल्या इयत्ता सहावी व नववीसाठीही गणित प्राविण्य परीक्षेचे आयोजन केले होते.
दरवर्षीप्रमाणे राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेप्रमाणेच गणित प्राविण्य परीक्षेमध्येही घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतून तन्वी दळवी, इयत्ता सहावीतून योगेश जोशी (तालुक्यात द्वितीय) व वेद गावडे तसेच इयत्ता नववीतून लता परब (तालुक्यात प्रथम) व पारस दळवी (संयुक्तपणे तालुक्यात तृतीय) क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थ्यांची प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व गणित शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
