कोल्हापूर येथील पथकाची कारवाई; ८ लाख ७८ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल जप्त
बांदा,ता.२६-:* बेकायदा दारू वाहतूक करताना कोल्हापूरच्या भरारी पथकाने इन्सुलीतील एकाला गवसे येथे ताब्यात घेतले. ही कारवाई काल आंबोली-आजरा मार्गावर करण्यात आली. यात संशयिताकडून ८ लाख ७८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॅनीश कामील फर्नांडिस (२६, रा. इन्सुली पागावाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून विविध ब्रँडचे एकूण १८० मिलीच्या ३८४ बाटल्या व ७५० मिलीच्या ४२० बाटल्या, अशी एकूण ३ लाख ५८ हजार ३२० रुपयांची दारु व वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख २० हजार रुपयांची स्विफ्ट कार (एमएच ४८ ए ६५०६), असा एकूण ८ लाख ७८ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या आदेशान्वये निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, जे. एस. पवार, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, संतोष बिराजदार, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.
