उणिवाचे रुपांतर संधी मध्ये करतो तोच यशस्वी होतो

दत्तात्रय तवटे;कणकवली महाविद्यालयात करीअर कट्टा उपक्रम

कणकवली ता.२६-:* शासकीय व खाजगी क्षेत्रात आजही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.मात्र शैक्षणिक पात्रते बरोबरच मुलाखतीला ही येथे अधिक महत्त्व असते. मुलाखत म्हणजे अंतर्दृष्टी होय.मुलाखतीची तयारी करताना परिघाच्या बाहेर जाऊन विचार करण्याची पात्रता नेहमी आपण ठेवली पाहिजे. तळकोकणातील विद्यार्थ्यांनी बुजरेपणा बाजूला ठेवून आत्मविश्वासाने व सकारात्मक पद्धतीने मुलाखतीत उतरले तर यश नक्की मिळते.आपल्या व्यक्तिमत्त्वातील उणिवांचे जो संधी मध्ये रुपांतर करतो तोच जीवनात यशस्वी ठरतो, असे प्रतिपादन एचपीसीएल कंपनी मुंबईचे माजी जनरल मॅनेजर श्री दत्तात्रय तवटे यांनी केले.

येथील कणकवली महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र कुमार चौगुले उपस्थित होते. यावेळी मंचावर करिअर कट्टा विभागाचे कणकवली तालुका समन्वयक प्रा.डाॅ. सोमनाथ कदम उपस्थित होते. श्री दत्तात्रय तवटे यांनी या वेळी ‘मुलाखतीची तयारी कशी करावी’ या विषयावर सविस्तर ,अभ्यासपूर्ण उद्बोधक आणि अनुभवाधारित असे मार्गदर्शन केले. श्री दत्तात्रय तवटे यांनी मुलाखती संदर्भात अनेक उदाहरणे व दाखले दिले.

‘मुलाखत आणि समूहचर्चा या दोन गोष्टींना खाजगी क्षेत्रात विशेष महत्त्व असते, तुम्ही काय शिकलात यापेक्षा तुम्ही किती व कसे व्यक्त होता ,तुमची देहबोली आणि अचूक उत्तर देण्याची पद्धत कशी आहे यावर बर्‍याच अंशी मुलाखत अवलंबून असते.सदासर्वदा आपले ज्ञान अद्यावत करायलाच हवे, असेही शेवटी श्री दत्तात्रय तवटे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. नम्रता पाटील यांनी केले. प्रस्ताविक प्रा. गणेश टेकळे यांनी केले. परिचय प्रा.प्रवीण कडुकर यांनी करून दिला. शेवटी आभार प्रदर्शन प्रा. प्रियांका पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व तृतीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page