मालवण ता.२५-:* ओम कबड्डी प्रबोधिनी, मुंबई व जय गणेश क्रीडा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने मालवणात दि. २१ मार्च पासून १६ वर्षाच्या आतील मुला – मुलींना कबड्डी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या शिबिरात अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. माया मेहेर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तारक राऊळ व सीताराम साळुंखे, एन.आय. एस. प्रशिक्षक जीवन पैलकर, राष्ट्रीय खेळाडू वैशाली सावंत या नामांकित खेळाडूंसह अन्य खेळाडू प्रशिक्षण देत आहेत. या शिबिरात मालवण येथील बोर्डिंग मैदानावर सकाळचे सत्र तर संध्याकाळचे सत्र भंडारी हायस्कूलच्या पटांगणावर घेतले जाते. मालवण येथील बोर्डिंग मैदानावर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण दिले जाते यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून त्यामध्ये शरीर तंदुरुस्तीचे धडे दिले जातात.
तर भंडारी हायस्कूलच्या पटांगणावर संध्याकाळच्या सत्रामध्ये शरीराला कोणतीही इजा होऊ नये यासाठी सुरुवातीला अर्धा तास पूर्व कवायती घेतल्या जातात. तसेच कोणता खेळाडू कोणती पक्कड चांगली करू शकतो, कोण चांगली चढाई करू शकतो तर प्रत्येक खेळाडू हा मैदानामध्ये कुठल्या जागी उभा राहिला पाहिजे, मध्य रक्षकाने काय केले पाहिजे, कोपरा रक्षकाने चवडा कसा काढला पाहिजे, एखाद्या खेळाडूची उत्तम पक्कड कशी करावी याचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात मालवण मधील विविध शाळांमधील एकूण ६५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दि. २७ मार्च पर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात ओम् कबड्डी प्रबोधिनी – कबड्डी प्रशिक्षक सौ. माया मेहेर(आक्रे) – अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार, तारक राऊळ – शिवछत्रपती पुरस्कार, सिताराम साळुंके – शिवछत्रपती पुरस्कार, जीवन पैलकर – एन. आय. एस. प्रशिक्षक, अजय पेंडुरकर, प्रमोद पेंडुरकर, लक्ष्मीनारायण कामत, अशोक परब, नंदू बोबाटे, रमेश लांबे, अनिल नागवेकर, राजू कवळे, वैशाली सावंत – राष्ट्रीय खेळाडू, कृष्णा काताळे, शशिकांत राऊत, हरिश्चंद्र साळुंके – स्थानिक प्रशिक्षक, संग्राम मांजरेकर – फिटनेस ट्रेनर – पुणेरी फलटण, शृंगार (नानु) राऊळ – फिटनेस ट्रेनर-मुंबई एफसी. राऊळ यांचे सहकारी परवेज व पवार, मालवण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रुजरिओ पिंटो, नितीन हडकर, रेनॉल्ड बुतेलो, मंदार ओरसकर हे प्रशिक्षण देत आहेत. तसेच शारीरिक तंदुरुस्ती बाबत शृंगार राऊळ, संग्राम मांजरेकर हे मार्गदर्शन देत आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमास एस. ए. फाउंडेशनचे प्रमुख सचिंद्र आहिरे, राष्ट्रीय खेळाडू तसेच सेवानिवृत्त डिव्हायएसपी नंदू गवस, रामेश्वर संस्थान आचरे चे अध्यक्ष मिलिंद मिराशी, सचिव अशोक पाडावे, कबड्डी खेळाडू तसेच फिजिओ शैलेश शेलार, पवन सामंतराय, परवेश शेख यांनी भेट दिली.
