भाजपच्या भूषण बोडस यांचे तहसीलदारांकडे निवेदन
देवगड ता.२५-: देवगड वातावरणात झालेल्या अचानक बदलांमुळे होणाऱ्या आंबा फळ गळ नुकसानीची हेकटरी १लाख रु नुकसान भरपाई देण्यात यावी .अशी मागणी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष भूषण बोडस माजी आमदार अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली देवगड तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम,मंडळ अध्यक्ष राजू शेट्ये,भाजप तालुका अध्यक्ष डॉ अमोल तेली,सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर,उत्तम बिर्जे,संतोष फाटक,नगरसेविका आद्या गुमास्ते,मनीषा जामसंडेकर,शंकर राणे,राजा भुजबळ,राजेंद्र बागवे,राजा भुजबळ,संदीप तावडे,नरेश डामरी,दयानंद पाटील,अजित राणे, मकरंद जोशी,उपस्थित होते. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मार्चअखेरीस आंबा फळे परिपक्व होण्यास सुरूवात झाली आहे आंबा काढणीचा हंगाम जोर धरू लागला आहे, परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड तापमान वाढीमुळे तयार झाली आंबाफळे उन्हाचा चटका सहन न झाल्याने भाजून जमिनीवर गळून पडत आहेत.
तसेच झाडावर असणाऱ्या वाटाणा आकारातील कळी पिवळी होऊन गळत आहे त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने निर्माण केलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात भर म्हणून आसनी नावाच्या चक्रीवादळामुळे गेले आठ दिवस पावसाळी हवामान आहे त्याचा दुष्परिणाम म्हणजे फळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील सहा महिन्यांपासून आंबाबागायतदारांनी विविध कीटकनाशकांच्या फवारण्या करून आंबा पिकांचे संरक्षण केले आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे .
परंतु या वातावरणीय बदलामुळे बागायतदार कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची भीती निर्माण झाली आहे .त्यावर उपाययोजना म्हणून शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख नुकसान भरपाई मंजूर करावी. तसेच कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून कार्यवाही करण्यात यावी .असे या निवेदनात नमूद केले आहे. त्याप्रमाणे दर ५ ते १० किलोमीटर अंतरावर वेदर स्टेशन उभारावी तसेच बंद असलेली वेदर स्टेशन तात्काळ सुरू करावी. फळपिक विमा योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करावी, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन विम्याचे निकष ठरवावे. आंबा वाहतूक करताना ओवरलोडच्या नियमात शिथिलता द्यावी त्या अनुषंगाने होणारी दंडात्मक कारवाई थांबविण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
