कणकवली ता.२४-:* महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व जिल्हा शालेय शिक्षण व प्रशिक्षण (डाएट)सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती कणकवली यांच्या वतीने स्टार्ट प्रकल्पाअंतर्गत इयत्ता १ लीच्या वर्गात दाखलपात्र होणाऱ्या बालकांसाठीच्या शाळापूर्व तयारी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन जि. प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. गौरी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कर्यक्रमाला खारेपाटण केंद्रशाळेचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ संतोष पाटणकर,बीआरसीचे प्रमुख सचिन तांबे ,केंद्रपमुख सद्गुरू कुबल,खारेपाटण केंद्रशाळेचे केंद्रमुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर,शेर्पे केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते. तर या प्रशिक्षण वर्गाला खारेपाटण व शेर्पे या दोन केंद्रातील सर्व प्राथमिक शाळेचे शिक्षक व दोन्ही केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच या प्रशिक्षण वर्गाला प्रदीप श्रावणकर ,श्री बागडी ,श्री खोत ,श्रीम.झिर्ले आदी शिक्षकांनी मास्टर ट्रेनर म्हणून मार्गदर्शक केले.
कोरोनाच्या जागतिक महामरीत बऱ्याच शाळा बंद असल्याने विद्यार्थी हा शिक्षण या प्रवाहापासून खूप दूर गेला होता.त्यामुळे गेल्यावर्षी शाळेत दाखल झालेली मुले व चालू शैक्षणिक वर्षी इयत्ता १ ली मध्ये शाळेत दाखल होणारी मुले यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काही झालेले नाही.त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वीच शिक्षणाची व शिक्षकांची आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हे प्रशिक्षणाचे वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी सांगितले.
खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे आयोजित करण्यात आलेल्या या शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण च्या दरम्यान शिक्षकांनी विविध शैक्षणिक वस्तूंचे स्टॉल उभारले होते.यावेळी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेमो घेण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारिरिक, बौद्धिक, भावनिक,शाब्दिक विविध चाचण्या घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले.प्रास्ताविक अनिल खोत यांनी केले तर सर्वांचे आभार सौ झिर्ले यांनी मानले.
