पदे गोठविण्यात अधिकार राज ठाकरे यांनाच; शिवजयंती निमित्त मोटरसायकल रॅली काढणार
कणकवली ता.१६-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्याचा किंवा पदे गोठविण्याचा अधिकार हा केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे. त्यामुळे कोणीही पदाधिकारी कोणत्याही पदाधिकाऱ्याला पदावरून काढून टाकू शकत नाही. पद गोठवू शकत नाही. त्यामुळे मनसेच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर कुडाळ तालुकाध्यक्ष पदाचा भार प्रसाद गावडे यांच्याकडेच सोपविण्यात आला असल्याचे मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात मनसेच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. २१ मार्च रोजी होणारी शिवजयंती व २ एप्रिल रोजी होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्याच्या धर्तीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरविण्यात आले.तसेच शिवजयंतीनिमित्त कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, कणकवली या चार तालुक्यात सकाळी मोटारसायकल रॅली काढण्याचे ठरविण्यात आले. ही रॅली ओरोस मुख्यालयापर्यंत काढून मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात येणार आहे.
तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील मूर्तीस हार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. २ तारीखचा पाडवा मेळावाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्ह्यात विविध ठिकाणी स्क्रीन लावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले. मनसेच्या जिल्हास्तरीय बैठकीनंतर परशुराम उपरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेच्या शिवजयंती आणि पाडवा मेळाव्यानिमित ठरविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, दत्ताराम गावकर, शैलेश अंधारी, जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, चंदन मेस्त्री, सचिन तावडे, विनोद सांडव, प्रसाद गावडे, सुनील गवस, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, अमित इब्रामपूरकर वइतर पदाधिकारी उपस्थित होते.
