मालवण ता.१६-:* मालवण तालुका भंडारी संघाच्यावतीने आयोजित आणि हडकर कुटुंबीयांच्या वतीने व सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत कै. लीलाधर गणेश हडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा स्मृतिलीला पुरस्कार यावर्षी अशोक कडू (क्रिकेट), बाळा मुणगेकर (व्हॉलीबॉल), रुजाय फर्नांडिस (बॅडमिंटन) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. १७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता भरड मालवण येथील हडकर निवास येथे होणार आहे.
मालवणचे माजी नगराध्यक्ष व क्रीडापटू स्व. लीलाधर हडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत व अष्टपैलू व्यक्तित्वास हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी या पुरस्काराचे द्वितीय वर्ष आहे, गतवर्षी हा पुरस्कार भाई खराडे यांना प्रदान करण्यात आला होता. यावर्षी अशोक कडू, बाळा मुणगेकर व रुजाय फर्नांडिस यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण तालुका भंडारी संघाचे अध्यक्ष रवी तळाशीलकर यांनी केले आहे.
