शास्त्रज्ञ पांडुरंग मोहिते यांनी व्यक्त केला विश्वास
वैभववाडी प्रतिनिधी नियोजनबद्ध पध्दतीने केलेली शेती निश्चित फायद्याची ठरते. नवीन तंत्रज्ञानाद्वारे व कमी खर्चात देखील शेतीतून चांगले उत्पन्न घेणे शक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून शेतीकडे पाहिले पाहिजे. वडलोपार्जित झाडे सांभाळणे ही देखील युवा शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे. इतर कामगारांवर अवलंबून न राहता स्वतः शेती विषयक ज्ञान आत्मसात करा व शेतीत उत्तरा, निश्चित तुम्ही प्रगतशील शेतकरी व्हाल, असा विश्वास शास्त्रज्ञ पांडुरंग मोहिते कृषी महाविद्यालय फोंडाघाट यांनी व्यक्त केला. आंबा व काजू विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना मोहिते यांनी केले.
वैभववाडी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सभापती अक्षता डाफळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती तथा आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे, नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती बापी मांजरेकर, राजेंद्र राणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, डॉ. अंबी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश संसारे, प्रगतशील शेतकरी मंगेश कदम, सुभाष जाधव, किशोर दळवी, कृषी सल्लागार विवेक कदम, प्रकाश पाटील, सुनील रावराणे आत्मा समिती सचिव राकेश हुले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयेंद्र रावराणे म्हणाले, आत्मा समितीने प्रदर्शन भरविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी हे प्रदर्शन आहे. अनेक बचत गट तालुक्यात चांगलं काम करत आहेत. त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांची कार्यपद्धती इतर बचत गटांना समजावी. हे या प्रदर्शनातून होऊ शकते. या प्रदर्शनात एकूण वीस स्टॉल सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना खूप काही शिकण्यासारखे मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या दोन दिवसात शेतकऱ्यांना मिळणार आहे असे सांगितले. नासीर काझी म्हणाले, भारत देश कृषिप्रधान आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा निश्चित आर्थिक स्तर उंचावेल. शासनाच्या विविध योजना या प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचणार आहेत. आत्मा समितीने प्रदर्शन भरवून एक शेतकऱ्यांना चांगला न्याय देण्याचे काम केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण रावराणे साहेब यांच्या उद्योग क्षेत्राकडून देशात तसेच जिल्ह्यात विविध क्रांतिकारी पावले उचलली जात आहेत. एमएसएमई च्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आर्थिक उन्नती साधली पाहिजे असे सांगितले.
सभापती अक्षता डाफळे म्हणाल्या, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योजनांची जनजागृती केली पाहिजे. बचत गटांनी कर्ज घेऊन घरी न बसता किंवा कर्जातून मिळालेले पैसे वाटून न घेता कुटुंबातील प्रगती साधण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन बालाजी वाघमोडे यांनी केले. यावेळी कृषी सहाय्यक, कृषिदूत, आत्म समिती सदस्य, शेतकरी, अंगणवाडी सेविका, आशा व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. फोटो – वैभववाडी येथे कृषी प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करताना सभापती अक्षता डाफळे. यावेळी उपस्थित आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे, माजी उपाध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्ष नेहा माईणकर व इतर पदाधिकारी.
