संस्थेच्या इतिहासात प्रथमच झाली निवडणूक
मालवण ता.१५-:* मालवण येथील गाबीत समाज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदाच्या निवडीत १३ पैकी ९ जागांवर बिनविरोध निवडी होऊन तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या असून विशेष मागास प्रवर्ग या एका जागेसाठी संस्थेच्या इतिहासात प्रथमच निवडणुक होऊन यामध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विष्णू उर्फ आपा गोपाळ पराडकर (२१७ मते) यांनी गंगाराम जनार्दन आडकर (६ मते) असा एकतर्फी पराभव करीत विजय मिळवला. संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड लवकरच करण्यात येणार आहे. गाबीत समाज नागरी सहकारी पतसंस्थेला २२ वर्षे झाली असून गेल्या स्थापनेपासून २२ वर्षात संचालक पदाच्या निवडी या बिनविरोध होऊन कधीही निवडणूक घेण्यात आली नाही. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत विष्णू उर्फ आपा पराडकर हेच अध्यक्ष राहिले आहेत. या संस्थेला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सन २०१७- १८ चा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पतसंस्था म्हणून पुरस्कारही प्राप्त आहे. यावर्षी या संस्थेच्या १३ संचालक पदाच्या निवडीत ९ जागांची निवड बिनविरोध झाली. यामध्ये सर्वसाधारण जागेवर रवींद्र आत्माराम मोर्वेकर, स्वप्नील भास्कर आचरेकर, सुधीर हरिश्चंद्र जोशी, प्रशांत महाबळेश्वर तोडणकर, नरेश चंद्रकांत हुले, प्रसाद दत्ताराम पाटील, संजय चंद्रकांत केळुसकर, सुनील सुधाकर मोंडकर यांची तर महिला सदस्याच्या एका जागेवर सौ. नितीशा संजीव केरकर यांची निवड झाली.
तर ओबीसी, मागास प्रवर्ग व महिला सदस्य दुसरी जागा अशा तीन जागांसाठी कोणाचेही उमेदवारी अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या आहेत. तर विशेष मागास प्रवर्ग राखीव जागेसाठी गंगाराम आडकर व विष्णू (आपा) पराडकर या दोघांनी अर्ज दाखल केल्यामुळे संस्थेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक घेण्यात आली. या एका जागेच्या निवडणुकीत आपा पराडकर यांना २१७ मते तर गंगाराम आडकर यांना ६ मते मिळाल्याने पराडकर यांनी एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. संचालक पदाच्या निवडीनंतर येत्या काही दिवसात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार असल्याचे विद्यमान अध्यक्ष आपा पराडकर यांनी सांगितले.
