मालवणात महिलांसाठी क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

मालवण ता.१५-:* मालवणमधील क्रिकेटला एक संस्कृती लाभलेली असतानाच आता मालवण मधील महिला देखील क्रिकेटचे मैदान गाजवण्यास सज्ज झाल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला डंका पिटत असताना मालवण मधील महिलांनी देखील प्रेरणा घेत स्वतःतील खिलाडू वृत्ती जपण्यासाठी आणि क्रिकेटच्या खेळात आपले कौशल्य दाखविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून क्रिकेटप्रेमी महिलांनी एकत्र येत महिलांसाठी क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले आहे.

याचा शुभारंभ मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर करण्यात आला. आज प्रत्येक श्रेत्रात महिला वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी बजावत आहे. खेळातही महिला मध्ये उत्तम कामगिरी करत नावारूपाला आलेल्या आहेत. क्रिकेट मध्येही आज महिला पुरुषांच्या बरोबरीने उत्तम खेळ साकारत आहेत. मालवण देखील आपल्या क्रिकेट संस्कृती साठी प्रसिद्ध असून यामध्ये आता महिला क्रिकेट प्रशिक्षणाची सुरुवात होत आहे. मालवण शहरातील क्रिकेटप्रेमी महिलांनी एकत्र येवून क्रिकेटमध्ये आपले कौशल्य आजमावण्यासाठी मालवणच्या बोर्डिंग मैदानावर महिला क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.

या प्रशिक्षणातून शहरातील मुली व महिलांमधील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन मिळावे तसेच भविष्यात मालवण मधून उत्तम महिला क्रिकेटपटू निर्माण होऊ शकतील अशी आशा बाळगून या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी प्रशिक्षक प्रशिक्षक म्हणून लाभलेले हेमंत मेस्त, गोविंद उर्फ बंटी केरकर यांचे महिलांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. अनुष्का चव्हाण, सौ. पूनम चव्हाण, सौ. पूजा करलकल, आकांक्षा शिरपुटे, सौ. नंदिनी गांवकर, चारू बागवे, हर्षाली सारंग, राणी तायशेटे, स्नेहल परब यांसह इतर महिला व युवती उपस्थित होत्या. या प्रशिक्षणाचा मालवण शहरातील महिला व मुलींनी स्वतःतील क्रीडा कौशल विकसित करण्यासाठी लाभ घ्यावा. प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला व युवतींनी अनुष्का चव्हाण (९४०४५४६३३७) पूनम चव्हाण (९४०४६८९३१६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page