सिंधुदुर्गचा ‘लोकनायक’…

खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग दि.१५ प्रसन्न गोंदावळे-:* ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्वाशी एकरूप होऊन आणि ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद घेऊन जो निःस्वार्थी भावनेने समाजकारणात सक्रिय असतो, तोच ‘लोकनायक’ ठरतो. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत खऱ्या अर्थाने लोकनायक ठरले आहेत. अशा या ‘कार्यसम्राट’ लोकनेत्याचा आज वाढदिवस… जनतेत वावरताना जनतेचाच होऊन जाणे ही खासदार राऊत यांची खासियत. तर कार्यकर्त्यांसोबत असताना आपले पद आणि मोठेपणा विसरून सर्वासामान्य कार्यकर्ता होऊन जाणे, हा त्यांचा गुणविशेष! जनतेच्या सुखदुःखात समरस होणारा असा हा दृष्टा खासदार ज़िल्ह्याला लाभला, ही ईश्वरकृपा नाही तर दुसरे काय? सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद कमी झाली अशी वल्गना होत असतानाच मूळ तळगाव, ता. मालवण येथील परंतु मुंबईस्थित शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात एन्ट्री झाली.

त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून वाटलं नव्हतं, की नारायण राणे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यासमोर सिंधुदुर्गात राऊत यांचा टिकाव लागेल. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर 25 वर्षे राणेंची एकहाती सत्ता होती. त्यांच्या सत्तेला सुरुंग लावणं कठीण होतं. परंतु दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या सत्तेला उलथून टाकण्याची सुरुवात केलेलीच होती, आणि वैभव नाईक तर पॅड बांधून तयार होतेच. या दोघांच्याही साथीने विनायक राऊत यांनी शांत, संयम दाखवत लोकसभेच्या निवडणुकीत निलेश राणे यांना पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने धोबीपछाड दिला आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाला सर्वसामान्यांचा हक्काचा खासदार मिळाला.

शिवसेनेत उच्चपदावर असले तरी कोकणात जास्त संपर्क नसल्याने विनायक राऊत जिल्ह्याला ज्ञात नव्हते. जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता हीच तर त्यांची ताकद. आपल्या विस्तीर्ण मतदारसंघात गावागावात त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अडीअडचणीला ते नेहमीच तयार असतात. त्यामुळेच अल्पावधीतच ते जनसामान्यांमध्ये लोकप्रिय खासदार बनले. पूर्वीचा राजापूर मतदारसंघ हा देशातील १ नंबरचा मतदारसंघ, आणि त्याचं प्रतिनिधित्व सुद्धा मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारख्या मातब्बर हस्तीनी केलं आहे. मधू दंडवते म्हणजे नानांचा तळागाळात संपर्क होता, परंतु सुरेश प्रभू देश पातळीवर काम करायचे, त्यामुळे कार्यकर्ते आणि जनता जनार्दन त्यांच्या जवळपास दिसत नव्हते. विनायक राऊत कदाचित त्यांच्या एवढे हुशार नसतीलही परंतु सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे, वेळोवेळी जिल्ह्यातील प्रश्नांवर संसदेत त्यांनी आवाज उठवून कामे करून घेतली आहे. खासदार निधीतून वेगवेगळी कामे त्यांनी दोन्ही जिल्ह्यात केलीत. सरकारच्या योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात.

सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे एखाद्या कामासाठी गेला तर खाली हाताने नक्कीच परतणार नाही. साधी राहणी आणि आपल्या हसतमुख, निर्गवी, शांत संयमी स्वभावामुळे जनसामान्यांच्या मनात त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या कामाच्या जोरावरच ते दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. त्यांना मिळालेलं आणि पहिल्या पेक्षा जास्त वाढलेलं मताधिक्यच त्यांची मतदारसंघात असलेली लोकप्रियता दाखवून देते.

नेता म्हणजे कोणी राजा नसून तो जनतेचा सेवक असतो, याची पुरेपूर जाण ठेवून खासदार राऊत यांनी राजकारणातील वाटचाल यशस्वी केली आहे. सलग दोनवेळा प्रचंड मताधिक्याने निवडून येऊनही त्याचा कोणताही बाऊ त्यांनी कधी केला नाही. एका सामान्य शिवसैनिकाप्रमाणेच ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. त्यांची ही देदीप्यमान कारकीर्द अधिकाधिक विस्तारत जावो, जनतेच्या मनातील त्यांचे स्थान अढळ राहो आणि त्यांचा पुढील प्रवास याहूनही यशस्वी होवो, याच ‘ग्लोबल महाराष्ट्र’कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

You cannot copy content of this page