सरपंच सेवा संघाची पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सावंतवाडी ता.१४-:ग्राम सुरक्षा दल कमिटीची निवड करून त्यांची नावे पोलिस स्थानकात देण्यात यावीत अशी माहिती पोलिस पाटील यांच्याकडून सर्व ग्रामपंचायतींना प्राप्त झाली असून, ही कमिटी नियुक्त करताना योग्य ते मार्गदर्शन करावे अशी मागणी तालुका सरपंच सेवा संघाकडून सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी कमिटी मध्ये सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करावी, एकूण सदस्य संख्या किती असावी, त्या सदस्यांच्या जबाबदारीची कामे कोणती, गावात काम करत असताना या सदस्यांना कोण सुरक्षा पुरविणार, या सदस्यांना ओळखपत्र देण्यात येणार का?, या कमिटीचा कार्यकाल किती असेल, त्यांच्या कामाची वेळ किती, त्यांना मानधन मिळणार आहे का, याबाबत ग्रामपंचायतीची जबाबदारी काय असणार आहे तसेच या कमिटीचा नेमका उद्देश काय आहे. इत्यादी बाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच सेवा संघ जिल्हा संघटक रोणापाल सरपंच सुरेश गावडे, तालुका सचिव तथा नाणोस सरपंच वासुदेव जोशी, निगुडे सरपंच समीर गावडे, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे आदी सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
