समीर नाईक : खड्डे बुजवण्याच्या नावाखाली मलमपट्टी होत असल्याचा आरोप
बांदा दि.१३-:* बांदा-शिरोडा मार्गावरील शेर्ले, मडुरा, पाडलोस, दांडेली भागात रस्त्याची अक्षरश: चाळण बनली आहे. सदर मार्गावर वारंवार खड्डे बुजविण्याच्या नावाखाली मलमपट्टी करण्यात येत आहे. वाहनचालक व प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी, युवासेना मळेवाड विभाग अधिकारी समीर नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. शेर्ले, मडुरा, पाडलोस भागात धोकादायक अपघाती खड्डे आहेत.
दोन महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्यात आले परंतु सद्यस्थितीत रस्ता जैसेथेच बनला आहे. दोन वर्षांत तीन वेळा खड्डे बुजवण्याच्या नावाखाली निधीचा दुरुपयोग झाल्यामुळे उखडलेल्या संपूर्ण रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खड्डे बुजवण्याची मलमपट्टी न करता सदर रस्ता निर्धोक करावा अशी मागणी समीर नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता सावंतवाडी यांच्याकडे केली आहे.
