प्रा. रुपेश पाटील;कलंबिस्त हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ उत्साहात
सावंतवाडी ता.१२-:* जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मभान, आत्मविश्वास व सातत्यपूर्ण प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहेत. यशाची ही त्रिसूत्री अंगी बाणवली तर आपली स्वप्ने साकार करता येतात, असे मत सुप्रसिद्ध वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ‘सदिच्छा समारंभात’ प्रा.रुपेश पाटील प्रमुख अतिथी वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव चंद्रकांत राणे, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, ज्येष्ठ शिक्षक शरद सावंत आदी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धा परीक्षा व शालेय, सहशालेय उपक्रमांतील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
तसेच इ.१०वी तील विद्यार्थिनी कु. श्रावणी भिवा पास्ते हिला ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रमुख वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून अतिशय रंजक पद्धतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जीवनानुभवाचे धडे दिले. यश मिळविण्यासाठी उपयुक्त अशा प्रेरक कथा सांगत, तसेच बोधप्रद व्हिडिओज दाखवत वास्तव परिस्थितीला कसं भिडल पाहिजे, चिकाटी, कौशल्य,आत्मविश्वास व सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे यशोशिखर कसं गाठलं पाहिजे, याचे उत्तम मार्गदर्शन करीत दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे सचिव चंद्रकांत राणे व मुख्याध्यापक अभिजीत जाधव तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनीही इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. इ.१०वी च्या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करुन शाळेला क्रीडा साहित्य खरेदीसाठी आर्थिक स्वरुपात गुरुदक्षिणाही सुपूर्द केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे सहाय्यक शिक्षक विलास चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन विद्यार्थीनी कु.दिक्षा देसाई व कु.श्रुती कुडतरकर यांनी तर आभारप्रदर्शन सहाय्यक शिक्षिका विनिता कविटकर यांनी केले.
