भरड भागात फटाक्यांची आतषबाजी ; एकमेव पदाधिकाऱ्याकडून केलेला जल्लोष शहरात बनला चर्चेचा विषय…
मालवण ता.११-:* देशातील चार राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊ सामंत यांनी गुरुवारी रात्री मालवण भरड भागात फटाक्यांची आतषबाजी करत घोषणा देत जल्लोष साजरा केला.
देशातील पाच राज्याच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यात जाहीर झालेला निकाल पाहता चार राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले. या यशानंतर देशभरात सर्वत्र भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत असताना मालवणात मात्र भाजपच्या कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून याची दखल घेण्यात आली नाही. मात्र यात भाजपचे सुरवातीपासूनचे निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ सामंत यांनी या विजयाचा जल्लोष रात्री भरड भागात फटाक्यांची आतषबाजी आणि एकट्यानेच जोरदार घोषणाबाजी करत केला. यात भाऊ सामंत या एकमेव पदाधिकाऱ्या व्यतिरिक्त अन्य भाजपचे कोणतेही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून न आल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.
