आचरा येथे पाच दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न
मालवण ता.११-:* शासनाची मदत येईपर्यंत वाट न बघता विविध स्तरांवर अडकलेल्या बाधितांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याची माहिती अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प संचालक मिलिंद वैद्य यांनी आचरा येथे दिली.
आचरे येथील।लौकिक सभागृह येथे पाच दिवस सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या सोबत आचरा सरपंच प्रणया टेमकर, तलाठी अनिल काळे, प्रशिक्षक विवेक नायडू, अक्षय चव्हाण, योगेश परदेशी, मनोज कनोलिया,लखन गायकवाड, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी आदी उपस्थित होते. याबाबत बोलताना वैद्य यांनी सांगितले की चक्रीवादळ संबंधित असलेल्या या प्रकल्पासाठी जागतिक बँकेने आर्थिक सहकार्य केले असून केंद्रशासन, राज्यशासनाचा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हा प्रकल्प राबविला जात आहे.
या दृष्टीने आचरा येथे चक्रीवादळ निवारण केंद्र उभारले जाणार असून ग्राम कृती दल च्या अनुषंगाने शिक्षण दिले जात आहे तीस जणांचा यात सहभाग आहे. यात आचरा, जामडूल, पिरावाडी, पारवाडी या चार महसूल गावातील लोकांचा सहभाग घेऊन प्रशिक्षण दिले जात आहेत .जिल्ह्यात चार निवारा केंद्र तयार होत असून मालवण तालुक्यातील आचरा आणि तारकर्ली लगत ही केंद्रे उभी राहणार आहेत.
