मालवण ता.१०-:* मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याने रोटरी क्लब मालवण आणि प्युअर ऍनिमल लव्हर (PAL) ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व मालवण नगरपालिका यांच्या सहकार्याने मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटीरेबीज लसीकरण मोहीम आज गुरुवारी सुरू करण्यात आली. या मोहिमेत दोन दिवसात २५ ते ३० कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील डम्पिंग ग्राऊंड येथील एका इमारती मध्ये आयोजित या निर्बीजीकरण मोहिमेचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी PAL ग्रुपच्या निधी सावंत, सुप्रिया दळवी, रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर, महेश काळसेकर, सुहास ओरसकर, भाऊ साळगावकर, अभय कदम, प्रसन्ना मयेकर, संदेश पवार, आवेक्षक सुधाकर पाटकर, राजा केरीपाळे, महेश परब आदी व इतर उपस्थित होते. यावेळी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांवर डॉ. राहुल बोंबटकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून निर्बीजीकरण (नसबंदी) शस्त्रक्रिया करण्यात आली.
तसेच अँटीरेबीज लसीकरण करण्यात आले. दोन दिवसात २५ ते ३० कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी रोटरी क्लबला नगरपालिका आवेक्षक सुधाकर पाटकर व राजा केरीपाळे यांचे सहकार्य लाभले. श्वानदंशापासुन धोका होऊ नये हा या मोहीमेचा उद्देश आहे. भटक्या कुत्र्याने दंश केल्यानतंर रेबीज होण्याची भीती मनात निर्माण होते. हे लक्षात घेऊन मालवणमधील भटक्या कुत्र्यांना अँटीरेबीज लस देण्याचे कार्य हाती घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांनी दिली.
