मनीषा गोवेकर;धाकोरा येथे महिला दिन उत्साहात
सावंतवाडी ता.१०-:* आजच्या काळातील महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून समाजात आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी स्वतःला स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, ग्रामीण भागातील महिलांनी ही यशस्वी झालेल्या महिलांचा आदर्श ठेवत स्वतःला सिद्ध करून उत्कर्ष साधावा, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी धाकोरा (ता. सावंतवाडी) येथे आयोजित कार्यक्रमात केले. जागतिक महिला दिनानिमित्त धाकोरा येथे कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भोमवाडी येथील अंगणवाडी सेविका सौ.कांबळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती सदस्य मनीषा गोवेकर यांनी भूषविले. यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा स्नेहा मुळीक, अंगणवाडी सेविका श्रीमती साटेलकर व धाकोरा परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात सौ.कांबळी यांनी ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषा गोवेकर यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास सांगत महिलांच्या उत्थानासाठी भारतीय थोर महिलांच्या योगदानाचे महत्त्व कथन केले. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो, याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री.सांगेलकर यांनी केले.
