जिल्ह्यात पुरेसे कटर नसल्याने शवविच्छेदन लांबतात

आरोग्य समितीत झाले उघड;मानधन वाढवून देण्याचा केला ठराव

सिंधुदुर्गनगरी ता ०७ मृतदेहाचे पोस्टमार्टम (शवविच्छेदन) करताना कटरमॅनची (सफाईगार) फार आवश्यकता असते. मात्र त्याला मानधन कमी असल्याने हे काम करायला कोणीही तयार होत नाही. तरी त्याचे मानधन १५०० रुपये पर्यंत वाढविण्यात यावे, असा ठराव आज पार पडलेल्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, समिती सदस्य लॉरेन्स मान्येकर, राजेश कविटकर , प्रितेश राऊळ, श्रिया सावंत, शारदा कांबळे, उन्नती धुरी आदींसह अन्य खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवागृहात काम करणाऱ्या कटरमॅनची संख्या फार कमी आहे. त्यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन करताना अनेक अडचणी येतात. त्यांना प्रतिमृतदेह ५०० रुपये एवढे मानधन देण्यात येत होते. त्यामुळे हे काम करायला कोणीही तयार होत नाही. तरी जिल्ह्याची गरज ओळखून आणि मृतदेहाचे शवविच्छेदन वेळीच व्हावे यासाठी कटरमॅन चे मानधन वाढविण्यात यावे, असा निर्णय आजच्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. तर प्रतिमृतदेह १५०० रुपये मानधन देण्यात यावे असा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.

दोडामार्ग तालुक्यातील भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम तीन वर्षांपासून मंजूर होऊन अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. संबंधित कामाला वारंवार मुदतवाढ देऊनही संबंधित ठेकेदाराकडून हे काम मुदतीत पूर्ण केले गेले नाही. आता या कामाची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. तरीही हे काम मुदतीत पूर्ण होईल असे वाटत नाही. तरी संबंधित कामाला यापुढे मुदतवाढ देऊ नये. काम पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असा ठराव आजच्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. सभापतींनी आरोग्य विभागाच्या कामाचे केले कौतुक

जिल्हा परिषदेची सभापती म्हणून ही शेवटची सभा आहे. २०१७-२०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत सर्व सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. या काळात अनेक चांगले वाईट अनुभव अनुभवयास मिळाले. मागील दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनाने सर्वांना त्रस्त करून सोडले होते. मात्र या काळातही सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक आदींनी उत्तम कामगिरी केली. या दोन वर्षच्या काळात आरोग्य यंत्रणा चांगल्या प्रकारे सक्षम बनली या काळात जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळाली याचे समाधान असल्याचे सभापती अनिशा दळवी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page